स्किल इंडिया मिशन अंतर्गत महिला सक्षमीकरणाचा उपक्रम
प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वत:चे उद्योग व व्यवसाय उभे करावे -बाळासाहेब पवार
नगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालय संचलित जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सावेडी, नंदनवन नगर येथील नैना मेक ओव्हर ॲण्ड अकॅडमीच्या वतीने ब्युटी पार्लर ॲण्ड हेअर कट प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. महिला व युवतींमधील कौशल्य विकसीत करुन महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने स्किल इंडिया मिशन अंतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाला महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या ब्युटी पार्लर ॲण्ड हेअर कट प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी रतन कानडे, सौ. रोशन कानडे, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, प्रशिक्षिका नयना कानडे आदींसह महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बाळासाहेब पवार म्हणाले की, शासनाच्या वतीने महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले असून, महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहे. जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण सुरु आहे. प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वत:चे उद्योग व व्यवसाय उभे करावे. संस्थेच्या माध्यमातून फक्त प्रशिक्षण देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग व प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रतन कानडे म्हणाले की, महिला आर्थिक सक्षम झाल्यास ते कुटुंब आपली प्रगती झपाट्याने साधू शकते. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून, उद्योग, व्यवसायात देखील महिला पुढे येत असल्याचे सांगून महिलांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. शफाकत सय्यद यांनी प्रास्ताविकात जन शिक्षण संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
या प्रशिक्षणात प्रत्येकी 20 महिलांचे दोन बॅच करण्यात आलेल्या आहेत. तीन महिने यामध्ये महिला व युवतींना ब्युटी पार्लर ॲण्ड हेअर कटचे अद्यावत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षिका नयना कानडे यांनी प्रशिक्षणाची माहिती देऊन महिला-युवतींना या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
