• Thu. Oct 16th, 2025

अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या डी परवाना शिबिराचे उद्घाटन

ByMirror

Jul 18, 2024

प्रशिक्षणातून घडणार अधिकृत फुटबॉल प्रशिक्षक

चांगले फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी चांगले प्रशिक्षक देखील निर्माण होण्याची गरज -नरेंद्र फिरोदिया

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने अधिकृत फुटबॉल प्रशिक्षक होण्यासाठी शहरात आयोजित केलेल्या डी परवाना शिबिराचे उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. फुटबॉल प्रशिक्षक घडविण्यासाठी पहिल्यांदाच ऑल इंडिया व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने पाच दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या उद्घाटन सोहळ्यासाठी असोसिएशनचे खजिनदार राणा परमार, सचिव रॉनप फर्नांडिस, सहसचिव प्रदिपकुमार जाधव, विक्टर जोसेफ, अहमदनगर महाविद्यालयाचे फिजीकल डायरेक्टर सॅविओ वेगास, उपप्राचार्य डॉ. नोएल पारघे, शहर बँकेचे संचालक प्रा. माणिक विधाते, ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनचे एज्युकेटर कोच सलिम पठाण, उपाध्यक्ष खालिद सय्यद, सहखजिनदार रणबीरसिंह परमार, कार्यकारिणी सदस्य पल्लवी सैंदाणे, राजू पाटोळे, जेव्हिअर स्वामी, रमेश परदेशी, जोनाथन जॉय आदींसह प्रशिक्षणार्थी खेळाडू उपस्थित होते.


नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, फुटबॉल प्रशिक्षक होण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंना एक चांगली संधी मिळाली आहे. चांगले फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी चांगले प्रशिक्षक देखील निर्माण होण्याची गरज आहे. फुटबॉल प्रशिक्षक या खेळाचा कणा आहे. फुटबॉल खेळाचा विकास व्हावा, या एकच भावनेने अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन कार्य करत आहे. या शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंना घडविण्यासाठी उत्तमप्रकारे प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एज्युकेटर कोच सलिम पठाण म्हणाले की, खेळाडूंनी आपले पॅशन करिअरमध्ये उतरवावे, यामुळे जीवनाचा खरा आनंद लुटता येणार आहे. फुटबॉल हा सर्वोत्तम खेळ असून, युवक-युवतींसाठी एक चांगले करिअर म्हणून या खेळाकडे पाहण्याची गरज आहे. खेळाडूंनी व प्रशिक्षकांनी या खेळाचे तंत्रशुध्द माहिती व ज्ञान आत्मसात करण्याचे त्यांनी आवाहन केले.


अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर 21 जुलै पर्यंत प्रशिक्षण चालणार असून, डी परवाना शिबिराला युवकांसह युवतींचा देखील प्रतिसाद मिळाला आहे. शिबिरासाठी असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर व अहमदनगर महाविद्यालयाचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. यामध्ये ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनचे एज्युकेटर कोच सलिम पठाण शिबिरार्थी प्रशिक्षकांना खेळातील नियम, अटी, खेळातील बारकावे, गुण पध्दती, खेळाडूंमध्ये कौशल्य निर्माण करणे आदी फुटबॉल खेळाशी संबंधीत मार्गदर्शन करणार आहे. प्रास्ताविक रॉनप फर्नांडिस यांनी केले. प्रदिपकुमार जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *