जय श्रीराम…, सियावर रामचंद्र की जय…. च्या घोषणांनी रेल्वे स्टेशन परिसर दणाणला
नागरिकांना साखर व डाळ वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशन रोड, प्रभाग 15 मधील मल्हार चौकात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलेल्या अडीच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमीपूजन खासदार विखे यांच्या हस्ते झाला. तर अयोध्या येथील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून, हा उत्सव सर्वांसाठी गोड करण्याच्या उद्देशाने परिसरातील नागरिकांना साखर व डाळ वाटप करण्यात आली.
प्रारंभी भक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला. भक्ती गीतांमध्ये उपस्थित नागरिक रममाण झाले होते. जय श्रीराम…, सियावर रामचंद्र की जय…. च्या घोषणांनी परिसर दणाणला. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल शिंदे, गीतांजली काळे, शहर सचिव दत्ता गाडळकर, विशाल खैरे, विजय गायकवाड, सुरेखा खैरे, रेखा विधाते, बाळासाहेब पाटोळे, कुंडलिक गदादे, अश्विनी गायकवाड, अनुराग आगरकर, सुरेश लालबागे, यशवंत खैरे, संदेश रपारिया, विजय घासे, पंडित खुडे आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात दत्ता गाडळकर म्हणाले की, श्रीप्रभू रामचंद्र यांचा अनेक वर्षाचा वनवास संपला असून, अयोध्येला मंदिर निर्माण होऊन प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. हा उत्सव भारतभर मोठ्या आनंदाने साजरा होणार असून, हा उत्सव गोड करण्यासाठी साखर व डाळ वाटप केली जात आहे. खासदार विखे यांनी शहराच्या विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याने अनेक विकास कामे मार्गी लागली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनाने कार्य केले. राज्यात व केंद्रात सत्ता असल्याने विकासात्मक बदल दिसत आहे. राम राज्याची संकल्पना साकारली जात आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या आनंदोत्सवासाठी प्रत्येकाच्या घरात गोड व्हावे, व प्रभू श्रीरामासाठी प्रत्येक घरात नैवद्यासाठी लाडू तयार करण्यासाठी डाळ व साखर वाटप करण्यात आली आहे. प्रसाद म्हणून तयार केलेले लाडू मारुती मंदिरात आणावे व सर्व लाडू एकत्र करून जवळील शाळेतील विद्यार्थ्यांना प्रसाद रूपाने वाटण्याचे त्यांनी सांगितले. प्रभागाच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याबद्दल नागरिकांच्या वतीने विशाल खैरे यांनी आभार मानले.