• Wed. Jan 15th, 2025

बसपा विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढविणार -डॉ. हुलगेश चलवादी

ByMirror

Aug 9, 2024

बहुजन समाज पार्टीच्या आढावा बैठकीत बुथ कमिट्या व गावोगावी शाखा स्थापन करण्याचे नियोजन

नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- येत्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या वतीने चांगले व सक्षम उमेदवार देऊन ते निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकत लावली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व जागा बसपा स्वबळावर लढविणार आहे. प्रस्थापितांविरोधात एक चांगला पर्याय म्हणून बसपाचा उमेदवार असणार असल्याची भूमिका पक्षाचे प्रदेश महासचिव डॉ. हुलगेश चलवादी यांनी मांडली.


बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी चलवादी बोलत होते. या बैठकीत नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य रामचंद्र जाधव उपस्थित होते. पुढे चलवादी म्हणाले की, विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आले आहे.

पदाधिकाऱ्यांच्या सूचना जाणून घेऊन जिल्ह्यात पक्ष संघटन मजबुत केले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नव्याने नियुक्ती झालेले सुनील ओव्हाळ, राजू खरात, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, महिला जिल्हाध्यक्षा अनुरीता झगडे, जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण, शहानवाज शेख, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, प्रकाश अहिरे, कोषाध्यक्ष सूर्यभान गोरे, जिल्हा सचिव सुभाष साबळे, जिल्हा बीव्हीएफ दत्तात्रय सोनवणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य अण्णासाहेब धाकतोंडे, सुनील मगर, महादेव त्रिभुवन यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनाने बुथ कमिट्या, गावोगावी शाखा स्थापन करुन बसपा पक्षाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फळी उभी केली जाणार आहे. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सेक्टर बुथ कमिटीची व प्रत्येक गावात शाखा खोलण्याची जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक विधानसभेसाठी निरीक्षक म्हणून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.


या बैठकीसाठी विधानसभा प्रभारी गणेश बागल, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, विधानसभा सचिव उस्मान शेख, श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष जाकीर शहा, महासचिव मच्छिंद्र ढोकणे, राहुरीचे विधानसभा प्रभारी साहेबराव मनतोडे, संजय संसारे, कर्जत-जामखेडचे सूर्यकांत सोनवणे, श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते सलीमभाई अत्तार, कचरू लष्करे, शेवगाव-पाथर्डीचे जयेश मगर, कोपरगावचे राहुल कोपरे, अर्जुन साळवे, जयसिंग यादव, पास्टर राजू गोरडे, प्रा. संगीता भांबळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध सूचना मांडून उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *