राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम
रामवाडी परिसरातील विद्यार्थ्यांनी केली धमाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याचा चिमुकल्यांनी मनमुराद आनंद लुटला. मुलांनी आकाशात फुगे सोडून एकच धमाल केली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊसाहेब उडानशिवे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते झाले. यावेळी फारूक रंगरेज, नामदेव पवार, सुदाम भोसले, उमेश भांबरकर, विकास धाडगे, सोमनाथ लोखंडे, मनोहर चकाले, विकास उडानशिवे, सनी साबळे, युनूस सय्यद आदींसह परिसरातील नागरिक व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात भाऊसाहेब उडानशिवे म्हणाले की, दरवर्षी राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा वाढदिवस त्यांच्या विचारानुसार सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी रामवाडीतील वंचित घटकातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांनी राजकारणात फक्त सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू ठेऊन समाजकारण केले. हा आदर्श समोर ठेऊन वंचित घटकातील मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अभिषेक कळमकर म्हणाले की, देशाचे नेतृत्व करताना राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी मातीशी नाळ कधीही तुटू दिली नाही. सर्वसामान्य, गोरगरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी राजकारण केले व त्यांच्या कल्याणासाठी विविध महत्वाकांक्षी निर्णय घेतले. महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली. आज महागाई, बेरोजगारी, जातीयवादाने सर्वसामान्य जनता भरडली जात असताना, या नेत्याकडून अवघ्या महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्राचा सर्वांगीन विकास साधला जाणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या धमालमय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खेळाचा आनंद घेतला. तर विद्यार्थ्यांना चॉकलेट, केकचे वाटप करण्यात आले. मुलांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे रामवाडीतील नागरिकांनी स्वागत करुन आभार मानले.