सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सक्षमीकरणाचे कार्य होणार -राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासाठी सावित्री ज्योती महोत्सवात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे. बचत गट फक्त आर्थिक उन्नतीसाठी नव्हे, तर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभावी माध्यम असून, या महोत्सवातून महिला सक्षमीकरणाचे कार्य होणार असल्याची भावना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 11 ते 14 जानेवारी दरम्यान सहाव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवात होणाऱ्या बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन व विविध सामाजिक उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संयोजन समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री विखे यांची भेट घेऊन चार दिवसीय महोत्सवाची माहिती दिली. यावेळी महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष तथा जिल्हा सरकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक सुहास सोनवणे, माविमचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे, मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे, चंद्रकांत ठोंबे, पोपट बनकर, आरती शिंदे, विनोद साळवे, तनिज शेख, दिनेश शिंदे, गणेश बनकर, रावसाहेब मगर, बाळासाहेब पाटोळे आदी उपस्थित होते.
ॲड. महेश शिंदे यांनी बचत गटातून कुटुंबाला हातभार लागावा. महिलांच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी व कच्चामाल, बाजारपेठ, कर्ज पुरवठा, भाग भांडवल, विक्री कौशल्य यांचे ज्ञान अवगत होण्यासाठी हे महोत्सव बचतगटांना दिशा देणारे ठरणार असल्याचे स्पष्ट केले.
या महोत्सवात शासकीय योजनांची माहिती, सर्व जातीय वधू वर मेळावा, बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन, राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त युवक युवतींसाठी विविध स्पर्धा, भव्य मोफत आरोग्य शिबिर, कवी संमेलन, ब्युटी सेमिनार, लोककला सादरीकरण, सावित्री ज्योती गौरव पुरस्कार, मुलगी वाचवा मुलगी शिकवा अभियान, मतदारा नोंदणी, व्यसनमुक्ती अभियान, कौशल्य विकास प्रशिक्षण, विधीज्ञ यांचा गौरव, मोफत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री यांना देण्यात आली.
महिला आर्थिक विकास महामंडळ, जय युवा अकॅडमी, अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा रुग्णालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, समाज कल्याण विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जिल्हा परिषद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, समाजकार्य महाविद्यालय, रयत प्रतिष्ठान, उडान फाउंडेशन आदींसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या संयोगाने हे महोत्सव होत आहे.
सावित्री ज्योती महोत्सव यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा परिषद महिला बालकल्याणचे कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, समाज कल्याणचे सहाय्यक उपायुक्त राधाकिसन देवढे, समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे, कासाचे सह प्रकल्प अधिकारी सुनील गायकवाड, अवतार मेहरबाबा ट्रस्टचे संचालक ॲड. मेहरनाथ कलचुरे, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. संजय घोगरे प्रयत्नशील आहेत.