नवीन शैक्षणिक धोरणाचा स्विकार करुन शिक्षकांनी अपडेट व्हावे -संध्याताई गायकवाड (शिक्षणाधिकारी)
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबीयांसाठी मदत जाहीर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इंटरनेटमुळे शिक्षक-विद्यार्थी जवळ आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाने वाटचाल करताना दैनंदिन जीवन आणि शिक्षण यांची जोड घालावी लागणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना अपडेट व्हावे लागणार आहे. विद्यार्थ्यांसमोर शिक्षक हा एक आयडॉल असतो. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या अहमदनगर एज्युकेश सोसायटीने आपली गुणवत्ता आजही जपली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदचे (माध्यमिक) शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त संस्थेमधील सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात शिक्षणाधिकारी गायकवाड बोलत होत्या. या कार्यक्रमास संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, सल्लागार मंडळाचे सदस्य आशाताई फिरोदिया, भूषण भंडारी, शैलेश मुनोत, पुष्पाताई फिरोदिया, तसेच मिनाताई बोरा, रविंद्र बाकलीवाल, जालिंदर बोरुडे, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अजय बारगळ आदींसह संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक परशुराम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध उपक्रम राबवून संस्थेच्या शाळांना प्रगतीपथावर नेले. शैक्षणिक, कला, क्रीडा धोरणांना चालना दिली. त्यांच्या ध्येय-धोरणाने यशस्वी वाटचाल संस्था करीत असून, शैक्षणिक गुणवत्तेसह कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक उल्हास दुगड यांनी करुन दिला. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील 99 गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने मुख्यमंत्री स्वच्छ शाळा-सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तीन लाख रूपयांचे बक्षीस मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार व शुभांगी जोशी यांनी केले. आभार मुख्याध्यापक अजय बारगळ यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीची मदत
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने फटका बसलेल्या 50 पूरग्रस्त कुटुंबियांसाठी 2 लाख रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तूसंच (किराणा व भांडी सेट) देण्याचे जाहीर करण्यात आले. लवकरच ही मदत पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने माहिती देण्यात आली.