मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश
सावित्रीबाई यांच्या योगदानाने सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला विराजमान -रामदास फुले
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, संत सावता महाराज मंदिर जीर्णोध्दार कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने गावातील महिला शिक्षिका व गुणवंत शालेय बालिकांचा सन्मान करुन सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले.
संत सावता महाराज मंदिरात बबन सय्यद यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच संजय जपकर यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका नूतन पाटोळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, शाखा अध्यक्ष शाहूराजे होले, माजी सरपंच अंबादास पुंड, उपसरपंच संजय जपकर, जालिंदर शिंदे, भानुदास फुले, सौरभ भुजबळ, पोलीस पाटील अरुण होले, युवा सेनेचे अध्यक्ष विनायक बेल्हेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कदम, राजेंद्र होळकर, प्रा. भाऊसाहेब पुंड, बबन सय्यद, सिद्धार्थ शिंदे, हर्षल चौरे, नवनाथ राऊत, सुरेश कदम, मच्छिंद्र भोळकर आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या महिला शिक्षिका मीना काठमोरे, नूतन पाटोळे, मुख्याध्यापिका पद्मा मांडगे, सुरेश कार्ले यांना रोप देऊन समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर केंद्रस्तरीय स्पर्धेत यश मिळवलेल्या स्वरा कर्पे (हस्ताक्षर), जिविका भुजबळ (गायन), खुशी कदम (वक्तृत्व) या गुणवंत विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संगीत खुर्ची, टिकली लावणे, ओंजळीने ग्लास भरणे आदी महिलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेच्या माळीण दुर्घटना नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला.
शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, सिंधुताई सपकाळ या कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा परिधान करुन मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश दिला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
रामदास फुले म्हणाले की, स्त्रियांना जगण्याचा व आपले कर्तृत्व सिध्द करण्याचा अधिकार सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मिळाला. मुलींची पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची दारे स्त्रियांसाठी खुले केले. यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. सावित्रीबाई यांच्या योगदानाने महिला सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत विराजमान असल्याचे त्यांनी सांगितले.