शहरात निस्वार्थपणे वाहतूक सुरळीत करण्याच्या कार्याबद्दल सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात वर्षभर ऊन, वारा व पाऊसात वाहतूक सुरळीत करण्याचे काम करणारे समाजसेवक अविनाश देडगावकर यांना हेल्पिंग हॅण्डस् फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष नाना भोरे, माजी शिक्षणाधिकारी संजय मेहेर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, बाबासाहेब वाकळे, संभाजी कदम, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, पै. मनोज लोंढे, संभाजी कदम, दत्ता कावरे, प्रा. सिताराम काकडे, प्रमोद कांबळे, भरत कुलकर्णी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अविनाश देडगावकर शहरात वाहतुक कोंडी होणाऱ्या चौका-चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतात. वाहतुक पोलीसांच्या खांद्याला-खांदा लाऊन ते निस्वार्थ व विनाशुल्क हे काम अनेक वर्षापासून करत आहे. पोलीस मित्र म्हणून त्यांची शहरात ओळख निर्माण झाली असून, शहरात कोठेही वाहतुक कोंडी झाल्यास ते सदर ठिकाणी धाव घेऊन वाहतुक सुरळीत करण्याची सेवा देत असतात. तसेच विविध ठिकाणी अपघातातील रुग्णांना मदत करण्याचे काम ते सातत्याने करत आहे. त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन हेल्पिंग हॅण्डस् फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेच्या वतीने त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल देडगावकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
