गृहोद्योग उभा करुन अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गृहद्योजिका सौ. मीरा बाळासाहेब बेरड यांना उद्यम इन्फो सोल्युशन्स (छत्रपती संभाजीनगर) या उद्योजक संस्थेच्या वतीने 2025-26 या आर्थिक वर्षात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या “उद्यम हिरकणी” पुरस्काराने गौरविण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील आईन्स्टाईन हॉल, महात्मा गांधी युनिव्हर्सिटी, सिडको येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात उद्योजक एन.बी. धुमाळ व एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशन्स माजी संचालक प्रशांत देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी उद्यम इन्फो सोल्युशन्स प्रा.ली. चे. संस्थापक संचालक उल्हास भाले, संचालिका दीपा भाले, कार्यक्रम समन्वयक तुषार जहागीरदार, सौरभ सावळे, वैष्णवी भक्कड तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मीरा बेरड या दरेवाडी येथील अमृत फूड्सच्या संचालिका आहेत. गेल्या सहा वर्षापासून त्यांनी गृहोद्योग उभा करुन अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचे आवळ्याचे विविध उत्पादनांना महाराष्ट्रासह इतर राज्यात मागणी आहे. त्या आपल्या उद्योगाबरोबरच इतर गृहोद्योग चालविणार्या महिलांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी तयार केलेला आवळा गुलाबजाम राज्यभर प्रसिध्द आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या विविध उपक्रम घेत असून, महिलांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी त्या सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना “उद्यम हिरकणी” पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
