आत्मनिर्भर होवून इतर महिलांना सक्षम करणाऱ्या बेरड यांच्या कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योग, व्यवसायातून आत्मनिर्भर होवून इतर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मिरा बाळासाहेब बेरड यांना वेद फाउंडेशन इंडियाच्या वतीने महिला दिनानिमित्त रणरागिनी नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. गृहोद्योगाच्या माध्यमातून यशस्वीपणे स्वत:चा व्यवसाय उभा करुन अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या बेरड यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.

हिंगोली येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते बेरड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार गजानन घुगे, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मोईन खान, वेद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वाती मोराळे, सचिव रत्नाकर मोराळे आदी उपस्थित होते.
हिंगोली येथे वेद फाउंडेशन इंडियाच्या वतीने मागील दहा वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व स्वत:चे कर्तृत्व सिध्द करणाऱ्या महिलांना पुरस्काररुपाने सन्मानित केले जाते. मिरा बेरड या दरेवाडी (ता. नगर) येथील अमृत फूड्सच्या संचालिका आहेत. गेल्या पाच वर्षापासून त्यांनी गृहोद्योग उभा करुन अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांचे आवळ्याचे विविध उत्पादनांना महाराष्ट्रासह इतर राज्यात मागणी आहे.
त्या आपल्या उद्योगाबरोबरच इतर गृहोद्योग चालविणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी तयार केलेला आवळा गुलाबजाम राज्यभर प्रसिध्द आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या विविध उपक्रम घेत असून, महिलांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना रणरागिनी नॅशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.