गणेश विसर्जन व पैगंबर जयंती मिरवणुकीनिमित्त घेतलेल्या निर्णयाचे स्वागत
समाजाला बरोबर घेऊन इतर समाजाला मान देण्याचे कार्य मुस्लिम समाजाने केले -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील धार्मिक ऐक्य व जातीय सलोख्यासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घेवून पैगंबर जयंतीची मिरवणुक दोन दिवस पुढे ढकलल्याबद्दल ग्रामदैवत श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तथा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी मोहरम उत्सव समितीचे अध्यक्ष करीम हुंडेकरी व ईद मिलादुन्नबी कमिटीचे अध्यक्ष अब्दुल कादिर शेख यांचा सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक (अनंत चतुर्दशी) व मोहंमद पैगंबर जयंती (ईद ए मिलादुन्नबी) उत्सवाची मिरवणुक एकाच दिवशी आल्याने दोन्ही उत्सवाचा मिरवणुक मार्ग व वेळ एकच असल्याने शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा पेच निर्माण झाला होता. नुकतचा मुस्लिम समाजाने पैगंबर जयंतीची मिरवणुक 1 ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय घेतल्याने मुस्लिम समाज बांधवांचे आभार मानून त्यांचा प्रातिनिधित सत्कार करण्यात आला.

यावेळी हाजी शौकत तांबोळी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, सागर गुंजाळ, अजीम राजे, फारूक रंगरेज, खलील सय्यद, नदीम हुंडेकरी, शहानवाज शेख, आय.बी. शाह, सलीम जरीवाला, अब्दुल खोकर, मोहंमद गफूर, फैसलशाह सय्यद आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, समाजाला बरोबर घेऊन इतर समाजाला मान देण्याचे कार्य शहरातील मुस्लिम समाजाने केले आहे. या निर्णयाने मुस्लिम समाजाने एक आदर्श निर्माण केला आहे. समाजात अनेक नेते आहेत, मात्र सामाजिक व धार्मिक ऐक्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. हिंदू-मुस्लिम समाजात समन्वय व मध्यस्थी करण्याचे काम या निर्णयाने झाले आहे. समाजात नेतृत्व करणाऱ्यांची स्पर्धा असते, मात्र या स्पर्धेत समाजाचे हित पाहणे देखील महत्त्वाचे ठरते. देशात सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, हेच भारताचे वेगळेपण आहे. या दोन्ही उत्सवातून भाईचाराचा संदेश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर या निर्णयाचे आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांनी देखील स्वागत केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.