माणुसकीच्या सेवेत हातभार -डॉ. प्रकाश कांकरिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया यांनी स्व. कन्हैय्यालालजी कांकरिया यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत देऊन गरजूंना फुड पाकीटचे वाटप केले.
सातत्याने लंगर सेवेच्या अन्न छत्रास मदत देणारे डॉ. कांकरिया दांम्पत्यांचा लंगर सेवेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, रवी बक्षी, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, राजू जग्गी आदी सेवादार उपस्थित होते.
डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, घर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीपासून शहरातील लाखो गरजू घटकांना दोन वेळचे अन्न देऊन त्यांची भूक भागविण्यात आली. लंगर सेवेच्या अन्न छत्रालयात अवघ्या 10 रुपयात एका व्यक्तीला पोटभर जेवणाचे फुड पॅकेट दिले जात आहेत. मागील चार वर्षापासून शहरात लंगरची सेवा अवितरत सुरु आहे. सामाजिक भावनेने सुरु असलेली सेवा कौतुकास्पद असून, माणुसकीच्या सेवेत हातभार लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जनक आहुजा यांनी अनेक दानशूरांचे हातभार लागत असल्याने ही सेवा अविरतपणे सुरु आहे. लंगर सेवेचा लाभ गरजू घटकांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हरजितसिंह वधवा म्हणाले की, कोणीही उपाशी पोटी झोपू नये, हाच एकमेव उद्देश ठेऊन लंगर सेवा केली जात आहे. या सेवा कार्यात अनेकांचे योगदान मिळाले असून, परिसरातील खासगी व सरकारी हॉस्पिटलच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.