• Fri. Sep 19th, 2025

भटके विमुक्त दिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

ByMirror

Sep 1, 2025

शैक्षणिक साहित्य वाटप; उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

भटक्या विमुक्त समाजात शिक्षण हेच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवणारे साधन -अनिल साळवे

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय व उमेद सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बोल्हेगाव, गांधी नगर येथील कै. बाळासाहेब केशव ठाकरे जिल्हा परिषद शाळेत भटके विमुक्त दिवस साजरा करण्यात आला. युवक कल्याण योजनेतंर्गत शालेय विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.


काकासाहेब म्हस्के हॉस्पिटलचे डॉ. यश चौधरी व डॉ. आझाद शेख यांनी शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आवश्‍यक ते औषधोपचार दिले. लहान मुलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव सचिन साळवी, सल्लागार ॲड. दीपक धीवर, उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे, मुख्याध्यापक अक्षय सातपुते, तसेच रवी साखरे, विजय लोंढे, प्रकाश भालेराव, रवी सुरेकर, अंबादास जाधव, अक्षय गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे म्हणाले की, भटक्या विमुक्त समाजात शिक्षण हेच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवणारे साधन आहे. या समाजात शिक्षणाची जाणीव निर्माण करून शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणे हा फाऊंडेशनचा संकल्प आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन जिल्हा परिषद व मनपा शाळांमध्ये तपासणी उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मुख्याध्यापक अक्षय सातपुते यांनी उमेद सोशल फाऊंडेशनने शाळेत भटके विमुक्त दिवस साजरा करून विद्यार्थ्यांना आत्मसन्मान दिला असून, या उपक्रमामुळे त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असल्याचे सांगितले.
शाळेच्या सहशिक्षिका सुरेखा घुले, प्रीती जाधव, गयाबाई गिते, वर्षा दिवे, श्रीमती एस. म्हस्के, तसेच सहशिक्षक योगेश राजळे, सुनील रोटे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी केले. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना नेहमीसाठी आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध नसते, त्यामुळे पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा कार्यालयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, प्रवीण कोंढावळे, प्रियंका खिंडारे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *