दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर फुलला आनंदाचा लंगर
सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवाभाव आणि मानवतेचा संगम साकारत, सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या 556 व्या जयंतीनिमित्त ‘प्रकाश गुरुपूरब’ हा विशेष उपक्रम दिव्यांग (दृष्टिहीन) मुलांसह साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे गुरुद्वाराचे वातावरण भक्ती, प्रेम आणि आनंदाने भारावले.
अनामप्रेम संस्थेतील दृष्टिहीन बालकांना अहिल्यानगर येथील गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपूरा येथे दर्शनासाठी आणण्यात आले. या मुलांनी कीर्तनात उपस्थिती दर्शवून गुरु ग्रंथ साहिबचे दर्शन घेतले. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हसू आणि समाधान पाहून उपस्थित सर्व महिला भारावून गेल्या.
सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या महिलांनी या मुलांना लंगर प्रसाद वाटप करून गुरु नानकांच्या शिकवणीतील ‘सेवा आणि समानता’ या मूल्यांचा प्रत्यय दिला. या उपक्रमाअंतर्गत संस्थेने गुरुद्वारातील लंगर सेवेसाठी आर्थिक मदत दिली तसेच निंबळक (एमआयडीसी जवळील सत्यमेव जयते ग्राम) येथील अनामप्रेम गोशाळेसाठी एका महिन्याचा चारा दान करण्यात आला. हा उपक्रम कार्तिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी झाल्याने त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वही लाभले.
या प्रसंगी प्रकल्प प्रमुख स्वीटी पंजाबी, जागृती ओबेरॉय, गीता नय्यर, अर्चना खंडेलवाल, डॉ. सिमरन वधवा, अन्नू थापर, गीता माळवडे, सीमा गुलाटी, ईशा मल्होत्रा, शिल्पा नय्यर, सिमी मक्कर, नीतू सलुजा, सुषिला मोडक, सुलभा मोडक, डॉ. बिंदू शिरसाठ, आरती लोहाडे, अभिलाषा मदान, नंदिनी जग्गी, पूनम धिंग्रा, प्रीती नय्यर, कविता कथेड, शीलू मक्कर, सुरेखा मनियार, उर्मिला झालानी या महिला उपस्थित होत्या.
स्वीटी पंजाबी म्हणाल्या की, गुरू नानक देवजींनी शिकवलेली सेवा, करुणा आणि समानतेची भावना आम्ही प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. अनामप्रेमच्या मुलांचे निरागस हास्य हे आमच्यासाठीच सर्वात मोठे समाधान ठरले. आज आम्ही त्यांना आमच्या गुरुद्वारात आणून आशीर्वाद घेण्याची संधी दिली, हा आमच्यासाठी आत्मिक आनंदाचा क्षण होता. लंगर सेवा आणि गोसेवा या दोन्ही माध्यमातून आम्ही समाजातील दुर्बल घटकांपर्यंत प्रेमाचा संदेश पोहोचवला, असल्याचे ते म्हणाल्या.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, दिव्यांग मुलांना केवळ मदतच नाही, तर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही खरी सेवा आहे. गुरू नानक देवजींच्या जयंतीनिमित्त झालेला हा उपक्रम म्हणजे दयाभाव आणि मानवतेचा उत्सव आहे. या उपक्रमात सहभागी सर्व महिलांनी आपल्या वेळेचा व आत्मीयतेचा उपयोग करून जे कार्य केले, ते खरं तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या महिलांनी केवळ लंगर नाही, तर ‘मानवी मूल्यांचा’ प्रसाद वाटला. सेवा हीच खरी प्रार्थना व माणुसकी असल्याचे त्यांनी सांगितले.अनामप्रेम संस्थेचे अजित माने सर यांनी सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करून मनःपूर्वक आभार मानले.
