ॲड. धनंजय जाधव यांनी उपलब्ध करुन दिली जागा
25 वर्षांची अखंड साईभक्ती परंपरेला हातभार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागील पंचवीस वर्षांपासून अहिल्यानगर ते श्रीक्षेत्र शिर्डी असा श्री साईदास परिवाराचा पालखी सोहळा अखंड भक्तीभावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. या पालखीतील श्री सार्इंच्या भव्यरथाच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी श्री साईभक्त ॲड. धनंजय जाधव यांनी जागा उपलब्ध करून दिली असून, त्या ठिकाणी पालखीसाठी शेड उभारण्याच्या कामाचे भूमीपूजन नुकतेच पार पडले.
ॲड. धनंजय जाधव यांनी ही जागा भाडेतत्त्वावर पूर्णतः विनामूल्य उपलब्ध करून दिली असून, त्यांच्या हस्ते शेड उभारण्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या भूमीपूजन कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष अजय काळे, विश्वस्त शंकर बोरुडे, प्रकाश म्हस्के, संजय बनसोडे, निशिकांत शिंदे, दत्ता डोळसे, विजय चौधरी, विजय शिंदे, तावरे, व्यंकटेश जोशी, लक्ष्मीकांत तिवारी, सोनू बोरुडे, धनंजय मडके यांच्यासह अनेक साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष अजय काळे म्हणाले की, “गेल्या पंचवीस वर्षांपासून श्री साईदास परिवाराच्या वतीने अहिल्यानगर ते श्रीक्षेत्र शिर्डी अशी पालखी भक्तीभावाने, सेवाभावाने आणि श्रद्धेने काढली जाते. या धार्मिक आणि सामाजिक कार्याला ॲड. धनंजय जाधव यांचे मोलाचे पाठबळ लाभत असून, त्यांनी दिलेल्या विनामूल्य जागेमुळे पालखी सेवेला मोठी मदत होणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी निशिकांत शिंदे यांनी उपस्थित सर्व साईभक्त आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.
