सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास पुढे येणे काळाची गरज -मोसीम शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर संगमवाडी (जि. पुणे) येथील त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी लवकरात लवकर भूमिपूजन करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख, प्रमोद वाघमारे, जिजाभाऊ जाधव, ना.म. साठे, आकाश साबळे, ब्लॉक उपाध्यक्ष आकाश लोखंडे, संजय लोखंडे, विशाल शिंदे, विजय पाथरे, सामाजिक कार्यकर्ते राजू शेख, विजय वैराळ, सुनील सकट आदी उपस्थित होते.
मोसीम शेख म्हणाले की, देशभक्ती व शत्रूंपासून देशाचे संरक्षण हे लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी अनेक क्रांतीकारक घडविले. सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास पुढे येणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आकाश साबळे यांनी लहुजींचा इतिहास अंधारात ठेवण्यात आला असून, त्याला खऱ्या अर्थाने जगापुढे मांडण्याची गरज आहे. संगमवाडी येथील त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रीय स्मारक उभे राहिल्यास त्यांचा इतिहास जगा समोर येण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
