अटलजींच्या विचारांना उजाळा
राष्ट्रहित सर्वोपरि ठेवणारे नेतृत्व म्हणजे अटलजी -मारुती पवार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष मारुती पवार यांच्या हस्ते स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास आनंद राठोड, सौरभ नानेकर, विवेक गायकवाड, वाबळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी अटलजींच्या कार्याचा, त्यांच्या दूरदृष्टीचा व राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा गौरव केला.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात राजकारणाला मूल्याधिष्ठित दिशा दिली. विरोधकांशीही संवाद साधत सर्वसमावेशक विकासाचा मार्ग त्यांनी देशासमोर ठेवला. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने पायाभूत सुविधा, परराष्ट्र धोरण, संरक्षण व सामाजिक सलोखा या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण वाटचाल केली, असे मत यावेळी व्यक्त केले.
मारुती पवार म्हणाले की, स्व. अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एका पक्षाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे नेते होते. राजकारणात सुसंस्कृतपणा, संवाद आणि समन्वय कसा असावा याचा आदर्श अटलजींनी घालून दिला. विचारधारेतील मतभेद असूनही राष्ट्रहितासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आजही मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांची आजच्या पिढीने जपणूक केली पाहिजे. त्यांनी संसदेत शब्दांच्या ताकदीने लोकशाही अधिक बळकट केली. आजच्या काळात त्यांच्या प्रामाणिकपणा, राष्ट्रनिष्ठा व दूरदृष्टीची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
