कोरडवाहू शेतीसाठी नवा मार्ग असल्याचा पीपल्स हेल्पलाईनचा दावा
रेन गेन बॅटरीच्या उपयोगाने पाणीटंचाईवर मात -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग आणि जलसंकट ही आजच्या काळातील गंभीर समस्या आहेत. यावर उपाय म्हणून रेन गेन बॅटरी आणि धनराई (ड्राय लँड हॉर्टिकल्चर) या संकल्पना केवळ कृषी समृद्धीच नाही, तर पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता संरक्षणासाठीही महत्त्वपूर्ण ठरू शकतात. पीपल्स हेल्पलाइनचे ज्येष्ठ विधी तज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी यासंदर्भात महास्वार्थातून महापरमार्थ हा सिद्धांत प्रकर्षाने समोर येत असल्याचा दावा केला आहे.
ॲड. गवळी यांनी रेन गेन बॅटरीच्या फायदेशीर परिणामांचा उल्लेख करतांना सांगितले की, या पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याचा साठा जास्त काळ टिकतो, मृदाची आर्द्रता कायम राहते, आणि परिणामी पीक उत्पादन वाढते. यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. ही पद्धत पर्यावरणपूरक असून, विविध जीवसृष्टींचे संरक्षण करण्यात मदत करते. पक्षी, मधमाशा, आणि परागीकरण करणारे कीटक टिकून राहतात, जे कृषी उत्पादन सुधारतात. झाडांखालील जमिनीत ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे वृक्षसंवर्धन आणि हरित क्षेत्र वाढते. या सर्व गोष्टी ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
धनराई म्हणजे ड्राय लँड हॉर्टिकल्चर, ज्यात कमी पाण्यात फळझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. कोरडवाहू जमिनीत रेन गेन बॅटरीचा वापर करून पाणीटंचाईवर मात केली जाऊ शकते, तसेच बंजर जमिनीतही उत्पादनशक्ती निर्माण होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांसाठी नवे उत्पन्न स्रोत उपलब्ध होतात, आणि निसर्गसंवर्धनाचे कार्यही साधले जाणार असल्याचे म्हंटले आहे.
महास्वार्थातून महापरमार्थ सिद्धांत: भविष्यासाठी एक टिकाऊ उपाय
महास्वार्थातून महापरमार्थ या सिद्धांतामुळे मानव आणि निसर्ग यांचा समतोल राखला जातो. थोड्या श्रमात मोठा लाभ मिळवता येतो. रेन गेन बॅटरीच्या सहाय्याने पाणीटंचाईवर मात करणे, उत्पादन वाढवणे, पर्यावरण वाचवणे आणि ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रण मिळवणे यासाठी कमी श्रम आणि कमी खर्च आवश्यक आहे. हे परिवर्तन सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. -ॲड. कारभारी गवळी