उमेद सोशल फाउंडेशन व उमंग फाउंडेशनचा उपक्रम
निराधारांना आधार दिल्यास त्यांचे जीवन सुसह्य होईल -राजेश मंचरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील उपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उमेद सोशल फाउंडेशन व उमंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रमात अनाथ मुले व वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर मुलांना शैक्षणिक साहित्य, कपडे तसेच किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे माऊली वृद्धाश्रमातील निराधार वृद्ध व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. समाजातील वंचित घटकांना आधार देऊन त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न या फाउंडेशनने केला. या कार्यक्रमाला वृद्धाश्रमाचे संस्थापक सुभाष वाघुंडे, संस्थापिका सौ. कल्पना वाघुंडे, उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, सचिव वैशाली कुलकर्णी, सचिव सचिन साळवी, खजिनदार संजय निर्मळ, सल्लागार ॲड. दीपक धिवर, उमंग फाउंडेशनचे डॉ. संतोष गिऱ्हे, राहुरी फॅक्टरी शाखेचे कार्यकारी अध्यक्ष राजेश मंचरे, शाखा सल्लागार रंजीत लहारे, कार्यकर्ते महेंद्र गीळे, कावेरी भिंगारदिवे, सुनील मोकळ, भाऊसाहेब मुन्तोडे, निलेश मेढे, विजय लोंढे, खिलारी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिनेते राजेश मंचरे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाने निराधारांना आधार दिला, तर त्यांचे जगणे सुसह्य होईल. निराधार हे वेगळे नसून ते आपल्यातीलच एक घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल साळवे यांनी वंचित घटकांप्रती आपुलकीची जाणीव समाजात निर्माण होणे आवश्यक आहे. हाच संदेश देण्यासाठी उमेद सोशल फाउंडेशन समाजोपयोगी कार्य सातत्याने राबवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. संतोष गिऱ्हे यांनी समाजातील तरुणांनी अशा प्रकारे पुढाकार घेतल्यास वृद्ध व निराधारांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद व समाधान फुलू शकणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात उपाध्यक्ष कुणाल तनपुरे यांनी फाउंडेशनच्या भविष्यातील ध्येयधोरणांची माहिती दिली. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सर्व प्रकारची मदत देण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात फाउंडेशन आपली जबाबदारी पार पाडणार असल्याचे ते म्हणाले.
शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, वडाळा महादेव येथील डॉ. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमातील सर्व मुले व वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीमुळे वृद्धांना व मुलांना आवश्यक उपचार व औषधोपचार मिळाले. वृद्धाश्रमाचे संस्थापक सुभाष वाघुंडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन संस्थेचे आभार व्यक्त केले.
या उपक्रमाचे नियोजन खिलारी सर यांनी केले होते. सूत्रसंचालन राजेश मंचरे यांनी केले. शिबिरासाठी दीपक ढवळे, अभिनेत्री प्रिया डोळस, आर.के. म्युझिकचे ऋतुराज काळे, गायक सोनू कांबळे, बलभीम चोपडे यांचे विशेष सहकार्य लाभले.