आपच्या वतीने नागरिकांची मोफत आरोग्य व रक्ताच्या विविध तपासण्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- आजही समाजात गुलामगिरी अस्तित्वात असून, ती संपविण्यासाठी बाबासाहेबांचे विचार दिशादर्शक आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवून राजकीय गुलामगिरी नष्ट करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्यांकडे सत्तेची सूत्रे देऊन सर्वांगीन विकास साधला जात असल्याचे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव प्रा. अशोक डोंगरे यांनी केले.
आम आदमी पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकात मोफत आरोग्य व रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रा. डोंगरे बोलत होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष भरत खाकाळ, उपाध्यक्ष संपत मोरे, गणेश मारवाडे, नितीन लोखंडे, सिताराम खाकाळ, प्रकाश वडवणीकर, ॲड. महेश शिंदे, दिलीप घुले, बाळासाहेब खेसे, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, ॲड. विद्या शिंदे, अनिल साळवे, तुकाराम भिंगारदिवे, विजय गवळी, रावसाहेब काळे, पोपट बनकर, एकनाथ लोंढे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे प्रा. डोंगरे म्हणाले की, माणसा-माणसात भेद करणारे विचार संपविल्यास एक आदर्श समाजाची निर्मिती होणार आहे. देशाची शासनकर्ती जमात बनण्यासाठी बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करण्याचा उपदेश केला. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे विचार अवलंबण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने नागरिकांची मोफत आरोग्य व रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या उपक्रमास नागरिकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद लाभला.