शिक्षक, प्राध्यापक हे देशाचे खरे हिरो -डॉ. शैलेंद्र देवळाणकर
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज घडविणारे शिक्षक, प्राध्यापक हे देशाचे खरे हिरो आहेत. देशाला सामाजिक स्थैर्य व विकासात्मक दिशा देण्याची भूमिका शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून होत असते. देश उभारणीसाठी शिक्षण क्षेत्राचे महत्त्वाचे स्थान आहे. बदलत्या काळानुरुप व स्किलच्या युगात नवीन शिक्षण पध्दतीचा सर्वांना अवलंब करावा लागणार असून, विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणे हेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.
स्व. माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवन गौरव पुरस्कार लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांना सपत्निक पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. देवळाणकर बोलत होते. शहराच्या नगर-पुणे महामार्ग येथील हॉटेल राजयोगच्या सभागृहात जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे श्रीराम थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश मुळे, उपाध्यक्ष दत्तापाटील नारळे, सचिव प्राचार्य एम.एम. तांबे, खजिनदार बजरंग पाडळकर आदी उपस्थित होते.
पुढे डॉ. देवळाणकर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात जीवनगौरव पुरस्कार कमी प्रमाणात दिले जातात. माजी कुलगुरु यांनी शिक्षण क्षेत्रात तब्बल 40 वर्ष दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान कौतुकास्पद आहे. नॅक मूल्यांकनसाठी त्यांनी केलेले कार्य दिशादर्शक असून, आज महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालय नॅक मुल्यांकनात आघाडीवर आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या यंग टॅलेंटला प्रोत्साहन देण्यासाठी देखील पुरस्कार देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व कौशल्यक्षम शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने भारतीय युवक उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असून, यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा परदेशात जात आहे. यासाठी आपल्याकडील शिक्षण पध्दतीत गुणात्मक सुधारणा करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार शिक्षणाने कौशल्य विकसीत केल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून देश विकसित होतात. सीमेवर ज्याप्रमाणे सैनिक देशाचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे शिक्षक नवीन शैक्षणिक धोरणातून नवभारत घडविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात दत्तापाटील नारळे यांनी गेल्या पाच वर्षापासून स्व. माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक कार्य सुरु असून, विविध उपक्रम राबविले जात असल्याचे स्पष्ट करुन प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला.
डॉ. सर्जेराव निमसे म्हणाले की, आयुष्यात स्व. माधवराव मुळे (आबा) ही आगळी-वेगळी व्यक्ती भेटली. उद्यमशील व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी अनेक उद्योग यशस्वी केले. अल्पशिक्षित राहून शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कार्य उभे केले. कोणावरही मत लादले नाही. सामंजस्यपणा व जवळच्या व्यक्तीचे मनापासून प्रश्न सोडवायची त्यांची वृत्ती असल्याचे सांगितले. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणवर (एनईपी) बोलताना काळातील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार केले गेले पाहिजे. सर्वच क्षेत्रात बदलाचे वारे झपाट्याने वाहत असताना नव्या शैक्षणिक धोरणाची गरज आहे. मुलांना इयत्ता सहावीपासूनच इंटर्नशिप दिली जाईल जेणेकरून त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळेल. शैक्षणिक धोरणात कोडिंग आणि तांत्रिक ज्ञानाचाही समावेश करण्याची तरतूद आहे. सध्या व्यावसायिक कौशल्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. नवीन शैक्षणिक धोरणात 2025 पर्यंत 50 टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा समावेश राहणार आहे. तर शून्य ते सहा वयोगटातील मुलांचे शिक्षण कसे असावे? व उच्च शिक्षणामधील धोरण यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
श्रीराम थोरात म्हणाले की, सामाजिक स्थिती बदलण्यासाठी शिक्षण क्षेत्राची जाणीव आबांना झाली. अल्पशिक्षित असतानाही त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. नगर शहरातील शिक्षण क्षेत्रात पायाभरणीचे काम त्यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी गावातच महाविद्यालय सुरू करण्यास पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी त्यांच्या कौशल्यांसह आवड जोपासू शकणार आहे. इयत्ता 9वी ते 12वी दरम्यान मुलांना त्यांच्या आवडीचे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करता येतील. विषयांच्या कॉम्बिनेशनमध्ये लवचिकता आणण्यात आली आहे आणि ती बहु-विद्याशाखीय बनवली आहे. म्हणजेच मॅथ-सायन्स, मॅथ-बायो, कॉमर्स, आणि आर्टस् विषयांच्या अनेक कॉम्बिनेशन्स घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले. आभार लालचंद हराळ यांनी मानले. यावेळी विश्वस्त महेश मुळे, नीलीम काळदाते, लालचंद हराळ, सुनील म्हस्के, प्रा. देवकर आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
