श्री नवनाथ युवा मंडळ व डोंगरे संस्थेच्या रक्तदान शिबिराच्या कार्याचे कौतुक
नगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात रक्तदान चळवळीला गती देऊन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून रक्तदान घडवून आणल्याबद्दल नालेगाव येथील जनकल्याण रक्त केंद्राच्या वतीने श्री नवनाथ युवा मंडळ व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचा सन्मान करण्यात आला.
जनकल्याण रक्त केंद्राच्या वतीने वर्षभर विविध जयंती, उत्सवात रक्तदान शिबिर घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी नवनाथ युवा मंडळ व डोंगरे संस्थेच्या वतीने पै. नाना डोंगरे यांनी सन्मान स्विकारला. यावेळी जनकल्याण रक्त केंद्राचे अध्यक्ष अभय मेस्त्री, कार्यवाहक संतोष इंदानी, जयदेवसिंग, पंकज यादव, डॉ. दिलीप वाणी, मुकुल पाटगावर, चंदन कटारिया, कपील धुमाळ, वाल्मिक कुलकर्णी, डॉ. विलास मढीकर, रुपेश भंडारी, पंकज शहा, सागर उंडे, सिता बडवे, शरद बळे, सोनाली खांडरे, डॉ. रुपाली म्हसे, अनिल धोकरीया आदी उपस्थित होते.
श्री नवनाथ युवा मंडळ व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष संदिप डोंगरे व पै. नाना डोंगरे मागील 15 वर्षापासून निमगाव वाघा (ता. नगर) येथे रक्तदान शिबिर आयोजित करत आहे. दरवर्षी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येते. सातत्याने संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे उपक्रम सुरु असून, या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
पै. नाना डोंगरे यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि सत्पात्री दान असून, रक्तदान चळवळ बळकट करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून शिबिर घेण्यात येत आहे. या चळवळीतून गरजू रुग्णांना जीवदान देण्याचे पुण्य मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक केले.