• Wed. Feb 18th, 2026

माळीवाड्यात फुले ब्रिगेडकडून शिवसन्मान सोहळा उत्साहात

ByMirror

Feb 18, 2026

महात्मा फुले व शिवाजी महाराजांना अभिवादन; ‘पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या महात्मा फुलेंना मानाचा मुजरा’


महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करुन समाजाला दिशा दिली -आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी करून समाजात इतिहासाचा अभिमान जागवला. त्या ऐतिहासिक कार्याला अभिवादन म्हणून फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे भव्य शिवसन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या सोहळ्यास महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर, माजी नगरसेवक किशोर डागवाले, नगरसेवक करण कराळे, अवधूत फुलसौंदर, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, राजेंद्र पडोळे, ज्ञानेश्‍वर रासकर, प्रा. माणिक विधाते, संतोष हजारे, रणजीत सत्रे, किरण जावळे, गणेश जाधव, नगरसेविका सुजाता पडोळे, रेणुका पुंड, निखिल ताठे, ब्रिजेश ताठे, आशिष भगत, शैलेश सत्रे, संकेत लोंढे आदींसह युवक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, समाजात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी साजरी केली. आज देशभरातच नव्हे तर परदेशातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. फुले ब्रिगेडच्या माध्यमातून आयोजित शिवसन्मान सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या महात्मा फुलेंना अभिवादन करणे हा आहे.


ते पुढे म्हणाले की, या दोन्ही महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले आणि समाजाला योग्य दिशा दिली. त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही समाजावर दिसून येतो. महापुरुषांच्या विचारांना केवळ अभिवादन न करता ते आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करणे हेच त्यांना खरे अभिवादन असल्याचे त्यांनी सांगितले.


फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर यांनी सांगितले की, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना गुरु मानून त्यांचे कार्य पुढे नेले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर ‘कुळवाडी भूषण’ हा एक हजार ओळींचा पोवाडा सादर करून त्यांचे महान कार्य जगासमोर मांडले.


आजच्या काळात महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करून त्यांना पुढे नेण्याची गरज अधिक आहे. फुले ब्रिगेडच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबविले जात असून, महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाज परिवर्तनाचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.


नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा भेट देऊन सत्कार
फुले ब्रिगेडच्या वतीने महापौर ज्योतीताई गाडे व उपमहापौर धनंजय जाधव यांचा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर माळीवाडा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी जलद प्रक्रिया राबवून पुढाकार घेण्याची मागणी देखील करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *