युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे व सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बोरुडे यांच्या पाठपुराव्याला यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदी पूल परिसरात खड्डेमय झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी (दि.10 ऑक्टोबर) रात्री उशिरा काँक्रीटीकरण पॅचिंग कामास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिना नदीला दोनदा आलेल्या पुरामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व पादचारी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारी आणि मागण्या लक्षात घेऊन युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बोरुडे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. त्यांनी हा गंभीर प्रश्न माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास आणून दिला. दोन्ही लोकप्रतिनिधींनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागास रस्ता दुरुस्तीचे निर्देश दिले, आणि शुक्रवारी रात्री उशिरा विभागाने दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली.
काम सुरु झाल्याने सीना नदी पूल परिसर ते आदर्श नगर, श्रीकृष्ण नगर, गणेश नगर, शिवाजीनगर या भागांतील नागरिकांना खड्डेमुक्त व सुरक्षित रस्ता मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. वाहनांची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली असून नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी दिलासा व्यक्त करत लोंढे व बोरुडे यांचे आभार मानले आहेत.
पै. महेश लोंढे म्हणाले की, नगर-कल्याण रोड हा शहरातील प्रमुख मार्ग असून, दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने काँक्रीटीकरण पॅचिंगचे काम सुरू केले. या कामामुळे आता या परिसरातील नागरिकांना खड्डेमुक्त व सुरळीत रस्ता उपलब्ध झाला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी रस्ता, पाणी, वीज अशा सर्व प्रश्नांवर आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. शहरातील प्रत्येक नागरिकाला सोयीस्कर सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने कार्य करत असल्याचे ते म्हणाले.