8 ते 14 वयोगटातील खेळाडूंचा दमदार सहभाग; मैदान गजबजले
भावी क्रीडापटू घडविण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या -प्राचार्य डॉ. माधव सरोदे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने व एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा 2026 कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. कॉलेजच्या भव्य मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या लहानग्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत स्पर्धेत रंगत आणली.
या स्पर्धांचे उद्घाटन राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सतीश उचिल, अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कारार्थी प्रा. सुनिल जाधव, ज्येष्ठ क्रीडा संघटक व क्रीडा पुरस्कारार्थी ॲड. भगीरथ निवृत्ती शिंदे, कार्याध्यक्ष रंगनाथ डागवाले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अरूण यशवंत चंद्रे, आयोजन समितीचे सचिव सुनील सिदगीर गोसावी, राज्य स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी राकेश सावे, चंद्रकांत पाटील, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने खेळाडू, प्रशिक्षक व पालक उपस्थित होते.
प्रास्ताविकात दिनेश भालेराव यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, लहान वयोगटातच मुला-मुलींना योग्य संधी व व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्यातील क्रीडा गुणांना दिशा मिळते. जिल्हा व राज्य पातळीवरील अशा स्पर्धांमधूनच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत असल्याचे ते म्हणाले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात शिस्त, सातत्य व परिश्रम यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सब ज्युनिअर वयोगटातील खेळाडूंमध्ये असलेले कौशल्य योग्य मार्गदर्शनाने देशासाठी यश मिळवून देऊ शकते. एस.एस.जी.एम. कॉलेजने अशा राज्यस्तरीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटविला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ही स्पर्धा 8, 10, 12 व 14 वर्ष वयोगटातील मुला-मुलींमध्ये घेण्यात आली. धावणे, उड्या, फेक प्रकार आदी विविध मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळपासूनच स्पर्धांना सुरुवात झाल्याने संपूर्ण मैदान खेळाडू, प्रशिक्षक व प्रेक्षकांनी गजबजून गेले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केले. यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजन समितीचे व एस.एस.जी.एम. कॉलेजचे कौतुक केले. या स्पर्धेमुळे ग्रामीण व शहरी भागातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाल्याची भावना उपस्थित पालक व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.
