प्रत्येक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी अबॅकस शिकावे -पोलीस उपअधीक्षक गणेश उगले
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आले असून, या माध्यमातून देशाची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच उंचावणार आहे. अबॅकससारख्या गणित सोडवण्याच्या जलद पद्धतीतून विद्यार्थ्यांच्या गणिती कौशल्यामध्ये वाढ होणार आहे.कमीतकमी वेळेत गणिती आकडेमोड करताना व अचूक उत्तरे देताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत होत आहे. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचे कार्य जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे व प्रत्येक विद्यार्थ्याने गुणवत्ता वाढीसाठी अबॅकस शिकले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांनी केले.
एव्हरेस्टच्या वतीने 34 व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक उगले बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निबंधक छगन गंडाळ, शहर बँकेचे संचालक सुभाष गुंदेचा, पत्रकार अरुण वाघमोडे, सिनेअभिनेता बालकलाकार साईराज सरडे, स्वरा आकडकर, संस्थापक अशोक कार्ले, नायब तहसीलदार संध्या येणारे, डॉ. कल्पना घडेकर-कार्ले, उद्योजिका प्रिया मुनोत, अनिकेत गुंदेचा, अतुल सरडे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा शुभेच्छा संदेश उपस्थितां समोर प्रसारित करण्यात आला. स्वागत अण्णासाहेब शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. कल्पना घडेकर यांनी नमूद केले की, गेल्या 43 वर्षांपासून एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने अबॅकसच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधून घडवलेले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात विविध मोठ्या पदांवर काम करताना हे विद्यार्थी अबॅकसचे आभार मानायला विसरत नाहीत, हीच आमची पुंजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अबॅकस स्पर्धेमध्ये सुमारे 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी अबॅकसचे प्रात्यक्षिक सादर केले. वर्षभरामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अबॅकस शिक्षिका दिपाली वागस्कर, पुनम मुथा, वैशाली माने, कविता तरोटे यांना बेस्ट टीचर पुरस्कार तर पुनम मुथा यांना स्टार टीचर पुरस्कार व इतर शिक्षिकांना उत्कृष्टपणे अबॅकस शिकवणाऱ्या शिक्षिका पूनम लोंढे या गॅलेक्सी टीचर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
कु.वैष्णवी वामन या विद्यार्थिनीला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर सुमारे 300 विद्यार्थ्यांना विविध गटांमध्ये पारितोषिके प्रदान करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित छावा हा चित्रपट दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांनी पोवाडा, गीते, श्लोक पठण तसेच विविध अभिनयातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले.