कोतवालीत इस्टेट एजंटवर गुन्हा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील फ्लॅट विक्रीच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन इस्टेट एजंटकडून मारहाण, शिवीगाळ व खंडणीची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 25 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्टेट एजंट इकराम नजीर तांबटकर (रा. घास गल्ली) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, फर्निचर व्यावसायिक यासर फिरोज तांबटकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यासर फिरोज तांबटकर यांचा फर्निचरचा व्यवसाय असून, ते आपल्या कुटुंबीयांसह शहरातील शहाजी रोड येथील एका इमारतीत फ्लॅट क्रमांक 201 व 202 मध्ये वास्तव्यास आहेत. हे दोन्ही फ्लॅट विक्रीसाठी असल्याने ते संभाव्य ग्राहक पाहत होते. याच संदर्भात त्यांची ओळख इस्टेट एजंट इकराम नजीर तांबटकर याच्याशी होती.
घटनेच्या दिवशी, 25 डिसेंबर रोजी यासर तांबटकर हे कापड बाजार परिसरातील लोकसेवा हॉटेलजवळ असताना इकराम तांबटकर तेथे आला. त्याने “तुमच्या फ्लॅटसाठी मी ग्राहक शोधला आहे,” असे सांगितले. मात्र, यासर तांबटकर यांनी “तुमच्या सांगण्यावरून फ्लॅट कोणाला विकणे बंधनकारक नाही,” असे स्पष्ट केले. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
इकराम तांबटकर याने “मी ज्याला सांगेन त्यालाच फ्लॅट विकायचा आणि मला दोन लाख रुपये द्यायचे, नाहीतर मी फ्लॅट विकू देणार नाही,” अशी धमकी दिली. यासर तांबटकर यांनी यास ठाम नकार दिल्याने आरोपीने हाताने मारहाण केली. तसेच “दोन लाख रुपये दे, नाहीतर हातपाय तोडून टाकीन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेदरम्यान यासर तांबटकर यांचा भाचा व त्यांचा एक मित्र यांनी मध्यस्थी त्यांची सुटका केली. मात्र आरोपी इकराम तांबटकर याने शिवीगाळ करत पुन्हा दोन लाख रुपये देण्याची धमकी दिली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व धमकावण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
