उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्विकारले नियुक्तीपत्र
वक्फ जमिनी संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडविणार -अजित पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्यांक आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी साहेबान जहागीरदार यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते जहागीरदार यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार किरण लहामटे, नजीब मुल्ला, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष इद्रीस नाईकवाडी, प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीतील राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे नुकतीच उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष इद्रीस नाईकवाडी व प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी जहागीरदार यांच्या फेरनिवडीची घोषणा केली. जहागीरदार यांनी शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाला बळकट करण्याचे काम केले आहे. तर अल्पसंख्यांक समाजातील युवकांचे उत्तम प्रकारे संगठन करुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा शहर जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री ना. अजित पवार म्हणाले की, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळला अधिक सक्षम करण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. महामंडळाला 300 कोट वरुन 500 कोट रुपये निधी देण्याचे मंजूर करण्यात आले आहे. यामुळे अल्पसंख्यांक समाजातील युवकांचा रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. वक्फ जमिनी संदर्भात कमिटी तयार करून बैठका घेतल्या जाणार असून, यामध्ये जातीने लक्ष घालून वक्फ जमिनी संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर अल्पसंख्याक समाजाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनाने देखील प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. जहागीरदार यांच्या निवडीबद्दल आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांची त्यांचे अभिनंदन केले.