दळवी परिवाराने वांबोरीच्या महेश मुनोत विद्यालयात राबविला उपक्रम
विद्यार्थ्यांना आधार देण्याचा उपक्रम प्रेरणादायी -हेमंत मुथा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षिका स्व. लिलाबाई बाबुराव दळवी-क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दळवी परिवाराच्या वतीने अ.ए.सो.च्या वांबोरी (ता. राहुरी) येथील महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 21 गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्यात आले. या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कासाठी आर्थिक मदत रोख स्वरुपात देण्यात आली. तर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
महेश मुनोत विद्यालयात शिक्षक प्रतिनिधी सुधाकर वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे को-चेअरमन हेमंत मुथा, बाबुराव दळवी, विनिता गणेश शेजुळ, योगेश (बंटी) वेताळ, प्राचार्य संतोष कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका वनिता बोऱ्हाडे, पर्यवेक्षक संतोष काळापहाड, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गणेश मोरे, सहसचिव वैशाली कांडेकर आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

स्व. लिलाबाई दळवी-क्षीरसागर यांनी वांबोरीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 35 वर्षे सेवा केली. त्यांनी सेवा काळातही अनेक गरजू मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करुन त्यांना मदत केली. त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा बँकेचे माजी टीडीओ बाबूराव दळवी यांनी पुढाकार घेऊन मागील वर्षी 7 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले होते. तर यावर्षी त्यांनी 21 गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले. तर योगेश (बंटी) हराळे यांनी 21 गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप केले.
हेमंत मुथा म्हणाले की, दळवी मॅडम शाळेत कार्यरत असताना नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य केले. हाच वारसा चालविणारे त्यांच्या कुटुंबीयांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. बाबूराव दळवी यांनी शिक्षणाने विद्यार्थ्यांचे भविष्य घडणार आहे. यासाठी गरजू घटकातील शालेय विद्यार्थ्यांना नेहमीच दळवी परिवाराच्या वतीने आर्थिक आधार देऊन त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी कार्य केले जाणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक सचिन कराळे यांनी केले. योगेश (बंटी) वेताळ यांनी समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणातून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे दळवी परिवाराचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. ज्योत्सना तोडमल यांनी एकल पालक व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे सर्व्हे करुन त्यांची शैक्षणिक पालकत्वासाठी नाव सुचवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत पाठक यांनी केले. आभार संभाजी पवार यांनी मानले. शाळेत राबविण्यात आलेल्या गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व उपक्रमाचे वांबोरी परिसरातून कौतुक होत आहे.