पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे अतिवृष्टी, ढगफुटी मानवनिर्मित
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे संतुलन राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दिवाळीसारख्या सणांमध्ये फटाक्यांचा अतिरेक करून आपणच निसर्गाचे नुकसान करतो. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणपूरक आणि फटाके-मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पर्यावरण रक्षक गोरक्षनाथ गवते यांनी केले आहे.
गवते म्हणाले की, फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनीप्रदूषण तर होतेच, पण विषारी दारू आणि स्फोटक पदार्थांमुळे वायूप्रदूषण वाढते. या प्रदूषणाचा परिणाम फक्त माणसावर नाही तर लाखो प्राणी, पक्षी आणि निसर्गावर होतो. फटाक्यांचा आवाज व धूर यामुळे पक्षी व प्राणी घाबरतात, त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी विस्कळीत होतात आणि अनेकदा ते मृत्युमुखी पडतात. हेच प्राणी-पक्षी पर्यावरणाचे निर्देशक आहेत, त्यामुळे त्यांचे रक्षण करणे हे आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे.
गवते यांनी पुढे सांगितले की, फटाके फोडण्यावर खर्च होणारा पैसा जर आपण अनाथ मुलं, मुली, वृद्धाश्रम किंवा गोशाळांना मदतीसाठी दिला, तर तो आनंद द्विगुणीत होईल. पर्यावरणाचे रक्षण आणि मानवतेची सेवा या दोन्ही गोष्टी एकत्र साधता येऊ शकतात. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून माझे पर्यावरण, माझी जबाबदारी! या भावनेतून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, अशी विनंतीही त्यांनी सर्व जनतेला केली.
जागतिक पर्यावरण विकास सरकारचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते यांनी पुढे सांगितले की, आज देशातील काही भाग दुष्काळाने तर काही भाग अतिवृष्टी व ढगफुटीने त्रस्त आहेत. ही परिस्थिती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. आपण निसर्गाच्या नियमांमध्ये सतत हस्तक्षेप करत आहोत जंगलतोड, औद्योगिक प्रदूषण, नद्यांचे अतिक्रमण यामुळेच या आपत्ती वाढल्या आहेत. जर आपत्ती टाळायच्या असतील तर निसर्गाचा सन्मान राखणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे अपरिहार्य आहे.
गोरक्षनाथ गवते हे 2011 पासून पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या उपक्रमांमध्ये एक विद्यार्थी एक झाड, कुऱ्हाडबंदी, डी.जे.बंदी, प्लास्टिकबंदी, व्यसनबंदी, हुंडाबंदी, शिकारबंदी, भ्रष्टाचारबंदी आदी जनजागृती मोहिमांचा समावेश आहे. तसेच त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, घर तेथे शौचालय, विषमुक्त शेती, रोगमुक्त भारत, बेटी बचाव बेटी पढाव, पाणी आडवा पाणी जिरवा, वायू व जलप्रदूषण बंदी यासारखी अनेक मोहिमा राबवून समाजात पर्यावरणप्रेम जागवले आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा पर्यावरण रक्षक नागरिक आहे, असे सांगत त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमधील युवकांमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.
