मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये स्विकारला पुरस्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल महादेव जाडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जाडकर यांनी पुरस्कार स्विकारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नरिमन पॉर्इंट मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) जमशेदजी बाबा नाट्यगृहात झालेल्या या शासनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, आमदार अग्रवाल, नवलचंद कोठारी, प्रकाश भांबरे, छाया जाडकर, अमित जाडकर आदी उपस्थित होते.
कांतीलाल जाडकर दिव्यांग असून, सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने योगदान देत आहे. पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे. यशवंत सेनेचे शहराध्यक्ष, तर जय मल्हार शैक्षणिक बहुउदेशीय सामाजिक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. भटक्या जमाती इतर मागासवर्गीय समाजातील विविध प्रश्न सोडविण्याचे कार्य ते करत आहे.
तर महिला सक्षमीकरणासाठी विशेष योगदान देत आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल जाडकर यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
