कष्टकरी पंचायतीच्या उपक्रमातून समाजप्रबोधनाचा संदेश
कष्टकरी वर्गाने प्रवाहात येण्यासाठी शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करावा -विकास उडानशिवे
नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडीत कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत अहिल्यानगरच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश देणारे विचार मांडण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे होते. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी अरुण साळवे, विकास घाडगे, विकास वाल्हेकर, मयूर उडानशिवे, भाऊ उमाप, विनोद गाडे, सर्जेराव साबळे, संजय शिंदे, दीपक साबळे, संपत शिंदे, अवि चिप्पा आदी उपस्थित होते.
विकास उडानशिवे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला सामाजिक न्याय, समानता व बंधुभावाचा विचार दिला.
आज त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे आपण सर्व एक समान हक्काने उभे राहू शकलो. कष्टकरी समाज, मागासवर्गीय व शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. आजही आपल्या समाजात अनेक अडचणी आहेत, पण त्या दूर करण्यासाठी आपल्याला शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.