• Thu. Sep 18th, 2025

गणेशोत्सवात तुला दानातून विद्यार्थ्यांना विचारांचे दान

ByMirror

Sep 4, 2025

जय आनंद महावीर मंडळाचा उपक्रम; नागापूर जिल्हा परिषद शाळेला पुस्तकांची भेट


वाचन संस्कृती वृध्दींगत करणारा प्रेरणादायी उपक्रम -आनंद भंडारी (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद)

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला हा देखावा सादर करण्यात आला आहे. या देखाव्यासोबतच मंडळाच्या वतीने तुला वाटप उपक्रम सुरु आहे. या उपक्रमातंर्गत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व मुलांवर संस्कार घडविण्याच्या उद्देशाने नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ग्रंथालयास 92 पुस्तकांची भेट देण्यात आली.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते शाळेच्या समन्वयक सोहनी सुभाष पुरनाळे यांच्याकडे पुस्तके सुपुर्द करण्यात आली. यावेळी डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, सनी मुथा, आदिती मुथा, आधुनिक कुरिअरचे संचालक विजय मुथा, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सचिव आनंद मुथा, सत्येन मुथा, नितीन मुनोत, अजित गांधी, बाबालाल गांधी, प्रकाश गांधी, संतोष कासवा, अमित गांधी आदींसह मंडळाचे सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सनी मुथा व आदिती मुथा यांनी मंडळाच्या या उपक्रमास पुस्तके उपलब्ध करुन दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांना डॉ. कांकरिया यांच्या वतीने ह्रद्य आरोग्याच्या गप्पागोष्टी हे पुस्तक भेट देण्यात आले.
आनंद भंडारी म्हणाले की, गणेशोत्सव हा जाती-धर्माच्या भिंती पार करून उत्साह निर्माण करतो. या उत्सवातून समाजात चैतन्य, उत्साह व आनंद निर्माण होत असतो. या उत्सवाला जय आनंद महावीर युवक मंडळाने सामाजिक उपक्रमाची जोड देऊन एक चांगला उपक्रम राबविला आहे. तुला दानातून पुस्तकांची मुलांना भेट मिळाली आहे. यातून वाचन संस्कृती वृध्दींगत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील वाचन प्रेरणा अभियान सुरू असून, या उपक्रमाला मंडळाचा देखील हातभार लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की, मंडळाने पुस्तकांची तुला करून शाळेला भेट देऊन आदर्शवत उपक्रम राबविला आहे. हे फक्त पुस्तकांचे दान नसून, विचारांचे दान आहे. वाचनातून मुले घडणार असून, त्यांच्यावर संस्कार होणार आहे. सुसंस्कारी पिढी घडविण्यासाठी मंडळाचा उपयुक्त प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. प्रकाश कराडकर यांनी उपक्रमाचे कौतिक करून, पुस्तकातून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडणार आहे. तर वाचन संस्कृती रुजणार असल्याचे सांगितले.


प्रास्ताविकात मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी मंडळाच्या वतीने वर्षभर रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, अन्नदान आणि गोरगरिबांना आधार देणारे उपक्रम राबविले जातात. दर महिन्याला एक ना एक सामाजिक उपक्रम सुरु असते. यावर्षी गणेशोत्सवात सुवर्णतुला देखाव्यासह सामाजिक तुला-वाटप उपक्रम सुरु असून, या उपक्रमातंर्गत गरजू कुटुंबीयांना किराणा किट देखील देऊन त्यांचा सण-उत्सव गोड केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार प्रकाश गांधी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *