• Thu. Oct 16th, 2025

कांदा भाजीपाला व फळ-फळावळ आडत्यांच्या असोसिएशनच्या संवेदनशीलतेने उजळलेली दिव्यांग कुटुंबीयांची दिवाळी

ByMirror

Oct 15, 2025

दिव्यांगांची दिवाळी होणार गोड; 100 दिव्यांग कुटुंबांना किराणा किट वाटप


व्यवसायाबरोबर दाखवली सामाजिक संवेदनशीलता

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी म्हटली की आनंद, गोडवा आणि प्रकाशाचा उत्सव. पण समाजातील अनेक आर्थिक दुर्बल घटकांसाठी हा उत्सव अनेकदा केवळ दिव्यांच्या उजेडात दिसणारा स्वप्नवत आनंद ठरतो. त्या दिव्यांना खऱ्या अर्थाने प्रकाशमान करण्याचे कार्य अहिल्यानगर कांदा भाजीपाला व फळ-फळावळ आडत्यांच्या असोसिएशनने.


दिव्यदृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्थेच्या 100 दिव्यांग सदस्य असलेल्या कुटुंबांना या असोसिएशनच्या वतीने दिवाळीसाठी लागणाऱ्या संपूर्ण किराणा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचे, आनंदाचे आणि आशेचे हास्य खुलले होते.


हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते किराणा किट वितरण करण्यात आले. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, सचिव मोहन गायकवाड, संचालक नंदकुमार बोरुडे, महेंद्र लोढा, अशोक निमसे, भास्कर म्हांडुळे, पंकज कर्डिले, राजेंद्र कार्ले, आदिनाथ शेडाळे, दिलीप ठोकळ, सुनील लोंढे, सुनील देशपांडे, नंदकिशोर शिक्रे, दिव्यदृष्टी संस्थेचे अध्यक्ष कृष्णा तवले, खजिनदार सुनील भास्कर, बँक अधिकारी सतीश कुलकर्णी, धवन उमरेडकर आदी उपस्थित होते.


असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे म्हणाले की, दिवाळी हा सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा सण आहे. मात्र समाजातील काही घटकांपर्यंत हा आनंद पोहोचत नाही. आर्थिक अडचणींमुळे अनेक दिव्यांग बांधव सण साजरा करू शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर थोडा गोडवा, थोडं समाधान आणण्यासाठी हा छोटासा प्रयत्न दरवर्षी साजरा केला जात आहे. हा उपक्रम केवळ किराणा वाटपापुरता नाही, तर दिव्यांग बांधवांप्रती असलेली आपुलकी आणि माणुसकीची भावना जपण्याचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा संवेदनशील उपक्रमात सहभागी व्हावे, हीच खरी दिवाळी असल्याचे ते म्हणाले.


सचिन जगताप म्हणाले की, दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. दिव्यांग बांधवांच्या जीवनातील संघर्ष पाहता, त्यांना आनंदाची ही ज्योत देणं हे फार मोठं कार्य आहे. अहिल्यानगर कांदा भाजीपाला व फळ-फळावळ आडत्यांच्या असोसिएशनने आज केवळ मदतीचा हात दिला नाही, तर त्यांचं मन उजळून टाकलं आहे. समाजात अजूनही अनेक ठिकाणी दिव्यांगांकडे दुर्लक्ष केलं जातं, पण आज या कार्यक्रमात माणुसकीचा खरा अर्थ म्हणजे आपल्या सणाच्या आनंदात इतरांनाही सामील करणे असून, ही खरी दिवाळी, हीच खरी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *