अहिल्यानगरच्या 7 नेमबाजांची सब नॅशनल स्पर्धेसाठी निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)-शहरातील खेळाडूंनी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत पदकांची कमार्इ करुन उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. अहिल्यानगर सिटी रायफल ॲण्ड पिस्तोल स्पोर्ट्स शूटिंग क्लबच्या तब्बल 7 खेळाडूंनी उत्कृष्ट नेमबाजी करत सब नॅशनल स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
या स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात किर्ती चक्रवर्ती हिने कास्य पदक मिळवले. तसेच 50 मीटर 3 पोझीशन रायफल प्रकारात कार्तिक कोल्हे याने चौथ क्रमांक मिळवला. आयुष काळे, आदेश खर्डे, पार्थ शिंदे यांनी अचूक निशाण साधत यश मिळवले. तर 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात रेवा शिंदे, अश्विनी महानूर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला.
या खेळाडूची गोवा येथे होणाऱ्या सब नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली असून या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अलीम शेख, ऋषिकेश दरंदले आणि सागर फाटके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्लबच्या सेक्रेटरी सुनीता लिपने यांनी खेळाडूंच्या तयारीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच खेळाडूंना हे यश मिळवता आले आहे. या यशाबद्दल खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, आमदार संग्राम जगताप, खासदार नीलेश लंके, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
