मानवी तस्करीविरोधात एकत्र येण्याची गरज -पोलीस उपअधीक्षक गणेश उगले
नगर (प्रतिनिधी)- समाजात वेगाने वाढणारी मानवी तस्करी ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली असून, तिचा बंदोबस्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानवी तस्करी व बाल न्याय अधिनियमविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी उगले बोलत होते. ही कार्यशाळा अहिल्यानगर येथील पोलीस रिक्रेशन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
पुढे उगले म्हणाले की, मानवी तस्करी रोखण्यासाठी केवळ पोलिसच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने सजग राहणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, की कोणतीही शंका आल्यास तत्काळ पोलीस प्रशासनास माहिती कळविण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यशाळेत बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. जयंत ओहळ यांनी बालकल्याण समितीची रचना व भूमिका विषद केली. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांनी बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 यावरील सविस्तर माहिती दिली. विशेष बाल पोलीस पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी बालांचे लैंगिक गुन्हे संरक्षण कायदा 2012 (पोस्को) यावर विवेचन केले. ॲड. अनुराधा येवले यांनी पिटा व पोस्को कायद्याचे सखोल विश्लेषण केले. इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे गोरख जाधव यांनी मानवी तस्करी व वेठबिगार प्रकरणांची उदाहरणांसह चर्चा केली.
कार्यशाळेअखेर मानवी तस्करी व वेठबिगार मुक्तीची सामूहिक शपथ घेण्यात आली. कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे 60 पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी माने यांनी केले. पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी भरोसा सेलचे हेड कॉन्स्टेबल उमेश इंगोले, महिला व बालविकास दीपा आटोळे (एल एच सी), अर्चना काळे (एएचटीयू ), ए.के पवार (एलएचसी ), एस.ए. सय्यद (एएचटीयू ), श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे मानवी तस्करी व वेठबिगार मुक्ततेचे जिल्हा समन्वयक सिराज शेख, अंबादास गुंजाळ, राहुल साबळे, संध्या कुलकर्णी, मंगेश थोरात, मयुरी वनवे, अनैतिक वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, म.पो.हे.कॉ. समिर सय्यद, अर्चना काळे, अनिता पवार, छाया रांधवण, सोन्याबापू काळे, महिला व बाल अपराध प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक ईशामोद्दीन पठाण, म.पो.हे.कॉ. दिपा आठवले, संजय हराळ यांनी विशेष परिश्रम घेतले.