राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड; धावपटूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता ही स्पर्धा वाडिया पार्क, जिल्हा क्रीडा संकुल, येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन दिनेश भालेराव, राहुल काळे व श्रीरामसेतु आवारी यांनी केले आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धांमधील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धांच्या आधारे जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार असून, हा संघ दि. 10 जानेवारी 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेणार आहे.
स्पर्धेत विविध वयोगटांनुसार धावण्याच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुरुष व महिला 10 कि.मी. धावणे, 20 वर्षांखालील मुले 8 कि.मी., 18 वर्षांखालील मुले 6 कि.मी., 16 वर्षांखालील मुले 2 कि.मी.,20 वर्षांखालील मुली 6 कि.मी., 18 वर्षांखालील मुली 4 कि.मी., 16 वर्षांखालील मुली 2 कि.मी. यांचा समावेश आहे.
14 वर्षांखालील खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. तसेच स्पर्धा फक्त जिल्ह्यातील खेळाडूंसाठीच खुली असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी सकाळी 7.00 वाजता स्पर्धास्थळीच करण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंनी आधार कार्ड व जन्म दाखला (मूळ कागदपत्रे) सोबत आणणे बंधनकारक आहे. यासोबतच AFI UID नंबर असणे आवश्यक असून, तो नसल्यास पुढील राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
20 वर्षा आतील मुले व मुली : 25 जानेवारी 2006 ते 24 जानेवारी 2008 दरम्यान जन्मलेले, 18 वर्षा आतील मुले व मुली : 25 जानेवारी 2008 ते 24 जानेवारी 2010 दरम्यान जन्मलेले व 16 वर्षा आतील मुले व मुली : 25 जानेवारी 2010 ते 24 जानेवारी 2012 दरम्यान जन्मलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव 9923837888, राहुल काळे 9975320837 व श्रीरामसेतु आवारी 9322015046 यांना संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.
