दिव्यांग कल्याणासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालय कार्यान्वित
दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध होणार -देविदास कोकाटे
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार स्थापन करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण विभागाच्या अंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी, गुरुवारी (दि. 1 मे) अहिल्यानगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडले. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी दिव्यांग कल्याणासाठी कार्यरत असलेल्या अनेक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन जि.प. जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विळद घाटचे प्रकल्प संचालक डॉ. अभिजित दिवटे, सावली संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, लंके प्रतिष्ठानचे लिगल ॲडव्हायझर उज्ज्वला घोडके, दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे, प्रहार संघटनेचे राजेंद्र पोकळे उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड म्हणाले की, या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी कामे केली जाणार आहे. यामुळे दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी अधिक गती येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या गरजांनुसार सेवा पुरविणे हे या कार्यालयाचे मुख्य उद्दिष्ट राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देविदास कोकाटे म्हणाले की, जिल्हास्तरावरील या कार्यालयामुळे दिव्यांगांना संबंधित सेवा एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध होणार आहे. ही सुविधा त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला गती देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी बाबासाहेब महापुरे, मधुकर घाडगे, डॉ. शंकर शेळके, संतोष सरवदे यांनी आपले मनोगत व्यक्त करत दिव्यांगांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. त्यांनी शासकीय पातळीवर अधिक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. अभिजीत दिवटे व डॉ. दीपक अनाप यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राद्वारे दिव्यांगांसाठी पुरविण्यात येणाऱ्या कृत्रिम अंगविकृती व साहाय्यक उपकरणांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, साहित्य केवळ शरीराला नव्हे तर आत्मविश्वासालाही चालना देणारे ठरणार असल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्याच्या पहिल्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड यांचा जिल्ह्यातील विशेष शाळा, कार्यशाळा व मतिमंद बालगृहातील मुख्याध्यापक व जिल्हयातील दिव्यांगाच्या विविध संघटनांनी सत्कार केला. या कार्यक्रमास मधुकर भावले, विजय आरोटे, योगेश अल्हाट, सचिन तरवडे, प्रदिप भोसले, भाऊसाहेब कदम, दिलीप जगधने आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय बळीद, गिन्यानदेव जाधव, सुयोग निमसे, उमाशंकर अवचट व मोहन कुंभखेले यानी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे यांनी केले. आभार प्रदर्शन विक्रम उंडे यांनी मानले.