देहरे ग्रामपंचायत आणि एटीटीएफ क्रीडा संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देहरे ग्रामपंचायत आणि एटीटीएफ क्रीडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात पार पडला. देहरे येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायतीकडून परिसरातील दिव्यांग बांधवांना क्रीडा साहित्याचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्यातील कौशल्यांना प्रोत्साहन देणे आणि समाजात समानतेचा संदेश देणे या उद्देशाने हा उपक्रम पार पडला.
ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक क्रीडा साहित्यांचे वाटप करण्यात आले. या साहित्यामुळे दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमात सेवानिवृत्ती शिक्षक हबीब शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि सामाजिक सहभाग याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. शेख यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरव करत गावकऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सरपंच शितल अनिल चोर, उपसरपंच प्रकाश लांडगे, ग्रामपंचायत सदस्य साजिद शेख, ग्रामविकास अधिकारी कृष्णा बडे, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पठारे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश काळे, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक संजय शिंदे, एटीटीएफ क्रीडा संघटनेचे महाराष्ट्र संस्थापक व अध्यक्ष सुहास मोरे, बाबासाहेब गायकवाड, भानुदास भगत, बापूसाहेब चोर, अनिल चोर, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शुभम पुंड, भाजपा दिव्यांग महाविकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत काळे, तसेच भाऊसाहेब रामराव काळे, भाऊसाहेब भानूदास काळे, मेघनाथ धनवटे, बबन करंडे, शंकर तोडमल, योगेश पिंपळे, धोंडिराम धनवटे, गणेश पुंड, अंबादास लांडगे, रतन पडागळे, ग्रामपंचायत व सोसायटीचे सर्व सदस्य आणि दिव्यांग नागरिक उपस्थित होते.
संजय शिंदे आणि माजी सरपंच सुभाष खजिनदार यांनी मार्गदर्शन करत दिव्यांगांच्या विकासासाठी अधिक उपक्रम राबविण्याची गरज अधोरेखित केली. सुहास मोरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत दिव्यांग बांधवांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम पुढील काळातही आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
