समाजातील कुरुपता दूर करण्याचे काम साहित्य करते -प्रेमानंद गज्वी
142 व्या हौतात्म्य (स्मृति) दिनानिमित्त छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अभिवादन करुन राज्यातील साहित्यिकांचा गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील कुरुपता दूर करण्याचे काम साहित्य करते. राजकारणाने समाज कलुषित झाला आहे. छत्रपती चौथे शिवाजी महाराज या क्रांतिकारी राजाचे आदर्श समोर ठेऊन साहित्यिकांना जबाबदारीने समाजाला पुढे घेऊन जावे लागणार आहे. साहित्यिक घाबरतील, तेव्हा सक्षम भारत उभा राहू शकणार नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे संविधानाने प्राप्त झाले असून, संविधानाच्या विरोधात वाटचाल असेल तेव्हा शोषित समाजाकडे पडलेले पाऊल असणार असल्याचे प्रतिपादन 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी केले.
हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या 142 व्या हौतात्म्य (स्मृति) दिनाचे अवचित्य साधून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने गुरुवारी (दि. 25 डिसेंबर) अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. तसेच छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे मानाचे राज्य साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रेमानंद गज्वी बोलत होते. यावेळी भांडाराचे सभापती व संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सहसचिव मुकेश (दादा) मुळे, खजिनदार ॲड दीपलक्ष्मी म्हसे, सदस्य, दीपक दरे, अरुणाताई काळे, निर्मलाताई काटे, कल्पनाताई वायकर, भंडाराचे चेअरमन प्रा. रवींद्र देवढे, व्हा चेअरमन सुरेश घुंगाडे, न्यू आर्टस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, प्राचार्य विजयकुमार पोकळे, भांडाराचे पदाधिकारी, संचालक व पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा. मेधाताई काळे, न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, प्राचार्य डॉ. रामदास टेकाळे, प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, राज्य साहित्य पुरस्कार समितीचे कार्यकारी समन्वयक प्रा. गणेश भगत व संस्थेत कार्यरत प्राध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे गज्वी म्हणाले की, सत्यासाठी काही किंमत मोजावी लागली तरी साहित्यिक व कलाकारांनी मागे हटू नये. कला कोणाची बटिक नसते, बटीक असलेली कला नसते, चांगले साहित्याला आपोआप समाज मान्यता व पुरस्कार मिळते. कलेसाठी जीवन, की जीवनासाठी कला! असे नसून ज्ञानासाठी कला असली पाहिजे. या तिसऱ्या चौकटीकडे साहित्यिकांना प्रवास करावा लागणार आहे. सत्य समोर आणणे हे लेखकाची नैतिक जबाबदारी असते, ते विसरु नये. सामाजिक प्रश्नांना जागरूक राहिले पाहिजे. ठेच लागली, वेदना झाल्या तर साहित्य निर्मिती होते. तसेच लेखकांनी इतरांच्या वेदनांशी समरूप होऊन देखील साहित्य निर्मिती करावी. जात सोडून आधुनिकतेकडे वाटचाल करावी माणसांनी माणूस म्हणून माणसांचे दुःख पहाण्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर व त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाधीस्थळावर अभिवादन करण्यात आले. संस्था गीत व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात सचिव व सभापती ॲड. विश्वासराव आठरे यांनी केले. चौथे शिवाजी महाराज यांच्या जीवनातील इतिहासाचा आढावा घेतला. त्यांचा कारभार, विकासात्मक उभारणी व हुतात्मा झाल्याचा इतिहास स्पष्ट केला. राज्यातील साहित्यिकांची मोट बांधण्याच्या उद्देशाने हा सोहळा दरवर्षी घेण्यात येतो. साहित्य संस्कृती वाढावी, वैचारिक वारसातून समाज समृद्ध व्हावा व साहित्य चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी हा पुरस्कार सोहळा दरवर्षी होत असून, हे सातवे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेचे ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी पुस्तकांची खरेदी करून ग्रंथालय संपन्न करण्यात आल्याचे स्पष्ट केले. पुरस्कारार्थींच्या सन्मानपत्राचे वाचन कार्यकारी समन्वयक प्रा. गणेश भगत यांनी केले.
परीक्षकांच्या वतीने भावना व्यक्त करताना प्राचार्य डॉ.एम.एम. तांबे म्हणाले की, पुरोगामी विचार पुढे घेऊन जाणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो. काल्पनिक साहित्यांना या पुरस्कारासाठी ग्राह्य धरले जात नाही. 180 प्रकारच्या साहित्यकृतीतून पुरस्कार निवडण्यात आले. त्यासाठी तब्बल सहा महिन्याचा कालावधी लागला व साहित्यकृतींना पुरस्कार देताना त्या मागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला.
या कार्यक्रमात पुरस्कारार्थींनी या पुरस्कार सोहळ्याने भारावलो असल्याचे सांगितले. तर आपल्या साहित्यकृतीच्या निर्मिती मागचा उद्देश स्पष्ट केला व स्वत:च्या व समाजातील जगण्याचे वास्तव लिखाणातून मांडल्याचे विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विवेक भापकर यांनी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी व साहित्य चळवळ समृद्ध करण्याचा उद्दिष्ट स्पष्ट केला. त्यासाठी हा पुरस्कार सोहळा असून, राज्यातील साहित्यिकांना एकत्र आणले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय आखाडे यांनी केले. आभार भांडारचे चेअरमन प्रा.रवींद्र देवढे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार 2025 प्राप्त पुढील प्रमाणे-
सातारा येथील विद्या पोळ- जगताप यांच्या बाय गं ( कादंबरी), बीड येथील दत्ता बारगजे यांच्या फकिरी ( आत्मचरित्र), ठाणे येथील डॉ. संजय दिगंबर जोशी यांच्या कथा जैवविविधतेची (लेख संग्रह), अकोले येथील प्रा. डॉ. रंजना मधुकर कदम यांच्या विचारवेध (वैचारिक), नाशिक येथील किरण भावसार यांच्या घामाचे संदर्भ (कवीता संग्रह), ठाणे येथील विद्या विनायक निकम यांच्या अस्वस्थ मनाचे पडघम (ललित ग्रंथ) या साहित्यकृतींना राज्य साहित्य पुरस्कार देण्यात येत आहे. तसेच अमरावती येथील ॲड. डॉ. नीता प्रफुल्ल कचवे यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जगण्याची देते दृष्टी (बालसाहित्य) या साहित्यकृतीला विशेष राज्य साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील साहित्य पुरस्कार प्रा. भानुदास रतन बेरड यांच्या गंध मातीचा (ललित ग्रंथ) या ग्रंथास जाहीर केला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, 10 हजार रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ पुरस्काराचे स्वरुप होते.
