स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेच्या आवारात वृक्षांची लागवड
शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांचा उपक्रम
स्व. अरुणकाकांचे विचार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आजही जिवंत -सचिन जगताप
नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे व उपक्रमशील शिक्षिका सौ. रेणुका बोडखे यांनी नगर तालुक्यातील पारगाव मौला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तर माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली.

गुणे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, मुख्याध्यापक संघाचे प्रा. सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, शरद दळवी, बबन शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष पाटील घिगे, माजी उपसभापती संतोष म्हस्के, दादासाहेब दरेकर, हिंद सेवा मंडळ सेवकांची पतपेढीचे अध्यक्ष दीपक आरडे, दीपक शिरसाट, प्रसाद सामलेटी, आनंद भंडारी, सरपंच वैभव बोठे, नाथा खेडकर, अमोल खेडकर, गोपीनाथ बोठे, हनुमंत बोठे, श्रीधर बोठे, भाऊ पांडुळे, राजाराम बोडखे, अर्जुन बोडखे, दौलत बोडखे, धर्मा बोठे, नंदकुमार गोरे, चि.नचिकेत बोडखे, विराज बोडखे आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात बाबासाहेब बोडखे म्हणाले की, ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पायावर उभे राहिलो आणि ज्यांनी जीवनात उभे करण्याचे काम केले ते माजी आमदार कै. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देऊन शालेय परिसरात झाडे लावण्यात आली. स्व. जगताप यांनी सर्वसामान्यांना जवळ करुन त्यांना उभे करण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन जगताप म्हणाले की, स्व. अरुणकाकांनी प्रत्येकाशी निर्माण केलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळे ते सर्वांना कुटुंबातील सदस्या प्रमाणे प्रिय बनले. माणसे जोडून त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. तर सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांनी काम केले. बाबासाहेब बोडखे हे देखील जगताप कुटुंबाचा एक भाग आहे. लहानपणी त्यांनी माझ्यासह भाऊ-बहीणींना शिक्षणाचे धडे दिले. काकांनी त्यांना दिलेला आधार ते कधीही विसरलेले नाही. काकांनी अशी माणसे कमावली असून, त्यांच्या विचाराने ते आजही समाजात कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, बोडखे परिवार आपल्या परिस्थितीची जाणीव ठेऊन गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत देण्याचे कार्य करत आहे. वंचित, दुर्लक्षीत घटकातील विद्यार्थ्यांना ते सातत्याने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करत असून, स्व. अरुणकाकांशी नेहमी कृतज्ञ राहून त्यांनी कार्य केले असल्याचे स्पष्ट केले. अभिलाष पाटील घिगे यांनी स्व. अरुणकाका यांनी ग्रामीण भागातील लोकांना जवळ करून त्यांचे प्रश्न सोडविले. सर्वसामान्यांना उभे करण्याचे काम केले. बोडखे परिवार देखील त्यांच्या माध्यमातून उभा राहिला असून, असे अनेक उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष म्हस्के म्हणाले की, स्व. अरुणकाकांनी प्रत्येक गावात माणसे घडवली. त्यांची पोकळी भरून निघणार नाही. मात्र त्यांचे विचार आजही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिवंत आहेत. त्यांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्याचा एक भाग म्हणून बोडखे शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह, वॉटर बॉटल, वही, पेन, कंपास आदी सर्व शैक्षणिक साहित्य असलेल्या संचचे वाटप सचिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी देखील आपल्या मनोगतामध्ये स्व. अरुणकाकांच्या आठवणींना उजाळा दिला.