यशवंती मराठा महिला मंडळाचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने रेल्वे स्टेशन येथील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा व त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षणाला प्रेरणा देणारा कार्यक्रम महिलांच्या पुढाकाराने पार पडला.
कार्यक्रमाला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा मायाताई कोल्हे, जिल्हाध्यक्षा गीतांजलीताई काळे, जिल्हा उपाध्यक्षा शीलाताई शिंदे, संघटक शोभा भालसिंग, सुरेखा खैरे, मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षा कविता दरंदले, आशाताई शिंदे, मंगल शिरसाठ, विद्या काळे, सारिका खांदवे, अर्पणा शेलार, शालेय शिक्षिका मनीषा शिंदे, वर्षा गायकवाड, मनीषा गिरमकर, दिपाली नवले, शबनम खान, विठ्ठल आठरे, श्रीमती कवडे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मायाताई कोल्हे म्हणाल्या की, मायाताई कोल्हे म्हणाल्या की, शाळा कोणतीही असो, छोटी किंवा मोठी जिद्द व चिकाटी असेल तर विद्यार्थी यशस्वी होतो. सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य महापालिका शाळांच्या माध्यमातून होत आहे. या मुलांना घडविण्याचे कार्य शिक्षक वर्ग करत असल्याचे त्यांनी सांगितले. गीतांजलीताई काळे यांनी शिक्षकांच्या कष्टाने भावी पिढी घडत आहे. या पिढीच्या भवितव्यासाठी यशवंती मराठा महिला मंडळ प्रोत्साहन देण्याचे कार्य करत असल्याचे स्पष्ट केले.
शीलाताई शिंदे म्हणाल्या की, मुलांना मिळालेल्या नवीन शैक्षणिक साहित्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. शिक्षणातूनच त्यांचे भवितव्य घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. शोभा भालसिंग यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार आत्मसात करण्याचे आवाहन केले. सुरेखा खैरे म्हणाल्या की, शिक्षणाने प्रत्येकात एक आत्मविश्वास निर्माण होतो. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षण ही यशाची पहिली पायरी ठरणार असल्याचे सांगून उच्च शिक्षण घेण्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक विजय दिघे यांनी महिलांनी सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणासाठी उचलेला पाऊल कौतुकास्पद प्रेरणादायी असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व दिशा मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी शाळेच्या वतीने महिला मंडळाच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा शिंदे यांनी केले. आभार भारती कवडे यांनी मानले.