ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचा उपक्रम
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील आंबेगाव मधील भगतवाडी व शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य बँक या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. तर या सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी, प्रविण साळवे, सारिका शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शालेय शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारिका शेलार यांनी ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या असक्षम घटकांच्या पाल्यांना शैक्षणिक आधार देण्याच्या हेतूने शैक्षणिक साहित्य बँक मोहिम चालविण्यात येत आहे. या बँकेच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आलेले असल्याची माहिती त्यांनी दिली.
सुप्रिया चौधरी म्हणाल्या की, सर्वसामान्य वर्गातील मुला-मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून होत आहे. आजचे विद्यार्थी उद्याच्या सक्षम भारताचे भवितव्य असून, त्यांच्या माध्यमातून समाज घडणार आहे. सामाजिक भावनेने त्यांना शिक्षणासाठी आधार दिला जात असल्याचे त्या म्हणाल्या. प्रविण साळवे यांनी फक्त अहिल्यानगर जिल्ह्यापुरते मर्यादीत न राहता राज्यभरातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य संस्था करीत आहे. शिक्षणाद्वारे सामाजिक बदल घडणार असून, त्या दृष्टीने कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने भगतवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक रामकिसन गवारी, उपशिक्षिका आशा बांबळे आणि शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष गवारी, उपशिक्षिका प्रियंका राजगुरू यांना कृतिशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी भीमाशंकर विद्यामंदिर व श्री टी.एस. बोराडे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक अमोल ठुबे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.