आपुलकी, आनंद आणि सेवाभावाचा अनोखा संगम
समाजसेवा म्हणजे केवळ देणं नव्हे, तर मनापासून जोडणं -संजय झिंजे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील आधार आपुलकी फाउंडेशनच्या वतीने युवान संस्थेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक संजय झिंजे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात आपुलकी, प्रेम आणि सामाजिक संवेदनेचा मिलाफ पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाला उद्योजक शरद मडूर, निलेश रोकडे, अनिकेत झिंजे, हेमंत लोहगांवकर, शुभम पोपळे, प्रणव लगड, युवान संस्थेचे संदीप कुसळकर, तसेच झिंजे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात आधार आपुलकी फाउंडेशनचे सदस्य, युवान संस्थेचे सुमारे 100 विद्यार्थ्यांनी एकत्र भोजन घेत आपुलकीचा आनंद अनुभवला. गेल्या दोन वर्षांपासून आधार आपुलकी फाउंडेशन सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. ज्येष्ठ नागरिकांचा वेळ आनंदी जावा, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात आणि आजी-आजोबा व तरुण पिढी यांच्यातील भावनिक अंतर कमी व्हावे, या उद्देशाने कार्य सुरु आहे. संस्थेच्या या कार्यात संजय झिंजे यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
संजय झिंजे म्हणाले की, समाजसेवा म्हणजे केवळ देणं नव्हे, तर मनापासून जोडणं आहे. युवान संस्थेतील विद्यार्थ्यांबरोबर आजचा क्षण हा आमच्यासाठीही संस्मरणीय ठरला. समाजात सकारात्मकता टिकून राहावी, यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने काही ना काही योगदान द्यावे, हीच आमची भूमिका आहे. आधार आपुलकी फाउंडेशनचा हेतू फक्त मदत करणे नाही, तर आपुलकीची भावना समाजात रुजविणे हा आहे. आजच्या कार्यक्रमातून ती भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसली असल्याचे ते म्हणाले.
हेमंत लोहगांवकर यांनी आमच्या फाउंडेशनचे सर्व उपक्रम हे प्रेम आणि सामाजिक संवेदनेवर आधारित आहेत. आजच्या उपक्रमात आम्ही केवळ भोजन वाटप केले नाही, तर मानवी संबंधांचा उत्सव साजरा केला. युवान संस्था अनाथ, निराधार असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करत आहे. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. संदीप कुसळकर यांनी ‘आधार आपुलकी’ संस्थेने दाखवलेली आपुलकी ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श प्रेरणा ठरणार असल्याचे सांगितले.
