कामगार कायद्याची पायमल्ली करणाऱ्या त्या हॉस्पिटलवर कारवाईची मागणी
कामगार, सुरक्षा रक्षक यांची पिळवणुक करुन थेट कामावरुन काढले जात असल्याची तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार कायद्याची पायमल्ली करुन सर्वसामान्य कामगार, सुरक्षा रक्षक यांची पिळवणुक करुन त्यांना थेट कामावरुन कमी करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात उपोषण करण्यात आले. या उपोषणात पिडीत कामगारांसह धडक कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस रावसाहेब काळे, जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा तनिज शेख, सुरेश शिर्के, गौरव गायकवाड, परवीन शेख, दत्ता वामन, प्रतिभा काळे, रेखा नेवसे, राजू पाटोळे, राजेंद्र शिंदे, छावाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे आदी सहभागी झाले होते.
सावेडी रोड येथील एका हॉस्पिटल मधील कामगार, सुरक्षा रक्षक यांना कामगार कायद्यानुसार लाभ दिले जात नाही. कामगारांना संरक्षण विमा, पीएफ, पगारी सुट्ट्या, बोनस आदींचा लाभ दिला जात नाही. त्यांची नोंद पुस्तके, वेतन लेखी, छोटी पुस्तक व नोंदवह्या अद्यावत ठेवलेल्या नसून, कामगारांना पेमेंट स्लिप दिली जात नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. कामगारांना ओळखपत्र, नियुक्तीपत्र न देता पगार कमी दिला जातो. याबाबत विचारणा करणारे महिला सुरक्षारक्षक प्रवीण शेख, प्रतिभा काळे, रेखा नेवसे यांना कामावरून काढून टाकण्यात आले असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
कामगार कायद्यानुसार लाभ न देता, 12 तास ड्युटी देऊन कामगारांची पिळवणूक व शोषण करणाऱ्या हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यायकारकपणे कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये कामगार, सुरक्षा रक्षक यांना कामगार कायद्यानुसार लाभ दिले जात नाही. 12-12 तास त्यांच्याकडून काम करुन घेऊन त्यांना अल्पवेतन दिले जाते. हॉस्पिटल मधील कामगारांचे मोठ्या प्रमाणात पिळवणूक व शोषण सुरु असून, या विरोधात धडक जनरल कामगार संघटना आंदोलन करुन वंचित कामगारांना न्याय मिळवून देणार आहे. -रावसाहेब काळे (जिल्हा सरचिटणीस, धडक कामगार संघटना)