महिला कार्यकर्त्यांचा छळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
मिरजगाव येथील महात्मा फुले स्मारकाच्या तोडफोडचा निषेध
नगर (प्रतिनिधी)- महिला कार्यकर्त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करुन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट इतर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावे आणि मिरजगाव (ता. कर्जत) येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात सुशांत म्हस्के, रोहित आव्हाड, संजय कांबळे, अविनाश कांबळे, विजय भांबळ, प्रतीक बारसे, विवेक भिंगारदिवे, सुनील साळवे, सिद्धांत कांबळे, विजय शिरसाठ, युवान चाबुकस्वार, शेखर पंचमुख, विनोद साळवे, शिवाजी भोसले, नवीन भिंगारदिवे, मोहन शिरसाठ, शंकर भिंगारदिवे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगर येथील विवाहित युवती ही घरून बेपत्ता असलेली तक्रार तेथील पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. सदर विवाहितेच्या तपासकामी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधिकारी हे पुणे मधील कोथरूड भागातील पोलीस स्टेशन येथे आले असता सदर विवाहितेला तीन सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर युवतींनी विवाहितेला वन स्टॉप सेंटर या सरकारी केंद्रात जमा केलेली माहिती असताना सामाजिक कार्यकर्त्या युवतींना कोथरूड पोलिसांच्या मदतीने छत्रपती संभाजी नगरचे पोलीस अधिकारी घेऊन पोलीस स्टेशनला आले. रात्रीच्या वेळी महिलांकडे कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही, हा कायद्याचा भाग आहे. तरी कोथरूड पोलिसांनी सदर तीन युवतींचा मानसिक व शारीरिक छळ केला, त्यांच्यावर घाणेरड्या व अर्वाच्य भाषेत जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खाते बदनाम होत आहे. या प्रकरणातील तीन युवतींचा छळ करुन जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट व इतर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावे, मिरजगाव (ता. कर्जत) येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
