• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

आयपीएस झाल्याबद्दल निखिल तांबे यांचा एस.टी. को-ऑप बँकेकडून सन्मान

ByMirror

Mar 13, 2026
जामखेड आगारातील हेल्पर काशिबा तांबे यांचा मुलगा ठरला प्रेरणादायी उदाहरण

जामखेड आगारातील हेल्पर काशिबा तांबे यांचा मुलगा ठरला प्रेरणादायी उदाहरण


“निखिल तांबे यांचे यश एस.टी. को-ऑप बँकेसाठी अभिमानास्पद -दत्तात्रय खेडकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून आयपीएस अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल निखिल काशिबा तांबे यांचा एस.टी. को-ऑप बँक, अहिल्यानगर शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला. जामखेड आगारातील एसटी महामंडळात हेल्पर म्हणून कार्यरत असलेल्या काशिबा तांबे यांच्या मुलाने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेल्या या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.


नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात निखिल तांबे यांनी 517 वी रँक मिळवून आयपीएस पदासाठी निवड मिळवली आहे. साध्या कुटुंबातील मुलाने देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याने समाजातील युवकांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.


या पार्श्‍वभूमीवर एसटी को-ऑप बँक अहिल्यानगर शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक दत्तात्रय खेडकर, शाखा व्यवस्थापक प्रशांत घोडके तसेच शाखाधिकारी वृंदा कंगले आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते निखिल तांबे यांना सन्मानित करण्यात आले.


यावेळी बोलताना बँकेचे संचालक दत्तात्रय खेडकर म्हणाले की, “निखिल तांबे यांचे यश हे केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे अभिमानाचे आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून पुढे येत त्यांनी देशातील सर्वोच्च सेवांपैकी एका सेवेत स्थान मिळवले आहे. त्यांची जिद्द, मेहनत आणि चिकाटी ही आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरणारी आहे. योग्य ध्येय निश्‍चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे निखिलने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. अशा गुणवंत युवकांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.”


शाखाधिकारी वृंदा कंगले यांनी देखील यावेळी भाषणात तांबे यांच्या यशाचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तांबे यांचे अभिनंदन करुन त्यांच्या यशाचा गौरव केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *