युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
भंडारे महाराज सतत भडकाऊ व भावनांशी खेळ करणारी विधाने करत असल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संग्राम भंडारे महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देण्यात आले. कीर्तनकार म्हणून परिचित असलेले संग्राम भंडारे महाराज हे सतत समाजात भडकाऊ व भावनांशी खेळ करणारी विधाने करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि.26 ऑगस्ट) युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांची भेट घेऊन सदर निवेदन दिले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोसिम शेख, भिंगार अध्यक्ष रिजवान शेख, भगवान पंढरीनाथ, खेडकर, अभिजीत कांबळे, सागर इरमल, शामराव वाघस्कर, अकदस शेख, रियाज शेख, नवाज शेख, अमित लोखंडे, अय्याज शेख, हसन शेख आदी उपस्थित होते.
अलीकडेच भंडारे यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असे धक्कादायक विधान केले. यामध्ये थोरात यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, समाजामध्ये अशा प्रकारचे उघड दहशतवादी वक्तव्य करणाऱ्या व खालच्या थराला जाऊन धमक्या देणाऱ्या कीर्तनकारावर कारवाई न झाल्याने चुकीचा संदेश जात आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. यामुळे समाजामध्ये पोलीस प्रशासनाकडून चांगला संदेश जावून कोणीही चूकीचे व भडकाऊ वक्तव्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी ज्या पद्धतीमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या विषयी चुकीच्या विधान केले आहे. त्याला 15 दिवस उलटूनही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. अशा प्रकारचे व्यक्ती एका ज्येष्ठ नेत्याला खालच्या पातळीवर टीका करुन धमक्या देत असेल, तर पोलीस प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे. -प्रशांत ओगले (प्रदेश उपाध्यक्ष, युवक काँग्रेस)