गुरुवारी सकाळी संपाच्या दिवशी शहरातून निघणार मोटरसायकल रॅली
अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी व इतर 18 मागण्यासाठी 14 डिसेंबर पासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा प्राथमिक (खाजगी, जिल्हा परिषद) माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची मंगळवारी (दि.12 डिसेंबर) सायंकाळी बैठक पार पडली.
या बैठकीत सर्व शिक्षक, शिक्षकेतर संघटना एकजुटीने उत्स्फूर्तपणे संपात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. तर जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांना या संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.14 डिसेंबर) सकाळी 9:30 वाजता न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले. ही मोटारसायकल रॅली शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने 14 डिसेंबर पासून राज्यव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत संपाचे नियोजन करण्यात आले. बैठकीसाठी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, शिक्षक भारतीचे राज्यसचिव सुनील गाडगे, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विठ्ठल उरमुडे, शिक्षक परिषदेचे शहराध्यक्ष बाबासाहेब बोडखे,गोवर्धन पांडुळे, वैभव सांगळे, राजेंद्र लांडे, प्रसाद सामलेटी, शेखर उंडे, भानुदास दळवी, अन्सार शेख, बापूसाहेब तांबे, शिरीष टेकाडे, रमजान हवलदार, राजेंद्र खेडकर, बबन गाडेकर, उद्धव गुंड, शंकर बारस्कर, केशवराव जाधव, राजेंद्र शिंदे, दत्ता पाटील कुलट, विद्युलता कुलट, बबन गाडेकर, आप्पासाहेब जगताप, विलास साठे, राजेंद्र ठोकळ, रावसाहेब रोहकले, राजेंद्र निमसे, संजय कळमकर आदी उपस्थित होते.
या बैठकीला समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, राज्य सरकारी कर्मचारी संघटना अहमदनगर शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, विलास पेद्राम, पुरुषोत्तम आडेप यांनी देखील हजेरी लावून संपाची माहिती दिली.